नामांकनासाठी एकच गर्दी
By admin | Published: February 2, 2017 12:27 AM2017-02-02T00:27:21+5:302017-02-02T00:27:21+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नामांकनाच्या बुधवारी अखेरच्या दिवशी येथील तहसील कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती.
निवडणूक : पुसदमध्ये गटांसाठी ७१, तर गणांसाठी १०९ अर्ज
पुसद : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नामांकनाच्या बुधवारी अखेरच्या दिवशी येथील तहसील कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. विविध पक्षांनी अखेरच्या दिवशी एबी फॉर्म दिल्याने नामांकन दाखल करणाऱ्यांची धांदल उडताना दिसत होती. नामांकनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेच्या आठ गणांसाठी ७१ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी १०९ अर्ज दाखल झाले होते.
पुसद तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीचे १६ गण आहे. बुधवारी नामांकनाची अखेरची तारीख होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यासह अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार नामांकनासाठी दाखल झाले होते. अनेक उमेदवार आपल्या समर्थकांसह तहसील कार्यालयात पोहोचले होते. त्यामुळे तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत १४ गावातील ४६ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले असून तालुक्यातील एक लाख ८३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून एक हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीनकुमार हिंगोले काम पाहात असून तालुक्यात २८८ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी २६८ पोलीस नियुक्त करण्यात आले आहे. तालुक्यातील १४ गावातील ४६ मतदान केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित केले. त्यात शेंबाळपिंपरी, बेलोरा, इसापूर, हिवळणी, दगडधानोरा, जवळी, लाखी, जांबबाजार, चोंढी, गहुली, धनसळ, भोजला, बोरी खु, हर्षी आदी गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
मोहात नाईक विरुद्ध नाईक
जिल्हा परिषदेचा मोहा गट सर्वसाधारण असून या गटात राष्ट्रवादीतर्फे आमदार मनोहरराव नाईकांचे सुपूत्र ययाती नाईक यांनी राष्ट्रवादीतर्फे नामांकन दाखल केले, तर त्यांच्याविरोधात भाजपातर्फे अॅड.निलय नाईक यांचे पुतणे अमेय अनिल नाईक यांनी नामांकन दाखल केले आहे. सर्वाधिक चुरशीची लढत या मतदारसंघात होणार असून जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.