डझनावर सिनीअर ठाणेदार ‘एलसीबी’तून बाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:40 PM2018-02-16T23:40:37+5:302018-02-16T23:41:08+5:30
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘मिनी एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी चक्क कनिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केले जाते. डझनावर सिनीअर पीआय असताना ज्युनिअरला एलसीबीत बसविण्यामागे ‘स्ट्राँग राजकीय शिफारस’ ही प्रशासकीय हतबलता सांगितली जाते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नुकतीच मुकुंद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. कुलकर्णी हे सन २००० च्या बॅचचे पीएसआय आहेत. निरीक्षक म्हणून अवघे अडीच-तीन वर्षे सेवा झाली असताना थेट एलसीबी दिली गेल्याने जिल्हाभरातील सिनिअर पोलीस निरीक्षकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. कुलकर्णी यांचा ‘पॉलिटिकल सोर्स’ स्ट्राँग असल्याचे सर्वश्रृत आहे. त्या बळावरच त्यांनी शिरपूर, वणी, एलसीबीसारखी सर्वाधिक वरकमाईची ठिकाणे पटकाविली. त्यांच्या या स्ट्राँग सोर्सपुढे पोलीस प्रशासनच नव्हे सत्ताधारी नेतेही हतबल झाल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यात वणी आणि एलसीबीत नियुक्ती मिळविण्याचे ‘भाग्य’ एम.डी. सोनवणे यांच्यानंतर केवळ कुलकर्णींना लाभले आहे. सोनवणेंचा एलसीबीतील कार्यकाळ संपून आता १५ ते १७ वर्ष होत आहे.
मुकुंद कुलकर्णींची एलसीबीतील ही नियुक्ती जिल्हा पोलीस दलातील बहुतांश अधिकाऱ्यांना खटकली आहे. एसपी व अॅडिशनल एसपीनंतर एलसीबी पीआय हा जिल्ह्याचा बॉस असतो. तो सिनीअर, चाणाक्ष, आव्हानात्मक गुन्ह्यांच्या तपासाचा अनुभव असणारा असणे अपेक्षित असते. कारण या निरीक्षकाला जिल्ह्यातील तमाम ठाणेदारांवर आणि वेळप्रसंगी एसडीपीओंवरसुद्धा नियंत्रण ठेवायचे असते. मात्र बहुतांश ठाणेदारांसाठी ज्युनिअर ठरत असलेल्या कुलकर्णींना जिल्हाभरातील पोलीस अधिकारी जुमाननार की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. एलसीबीचे अद्याप धाड सत्र सुरू झाले नाही. या धाडी वाढल्यानंतर एलसीबी व पोलीस ठाण्यांमध्ये ठिंणगी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एलसीबीचा पोलीस प्रमुख हा बहुतांश सिनिअर व गुणवत्तेवर निवडला जातो. पूर्वी पोलीस महानिरीक्षकांमार्फत ही नियुक्ती केली जायची. आता घटक प्रमुख अर्थात पोलीस अधीक्षकांनाच या नियुक्तीचे अधिकार दिले गेले आहे. कुलकर्णींची झालेली नियुक्ती पाहता ज्येष्ठता व गुणवत्ता प्रशासनाने जणू गुंडाळून ठेवल्याचे दिसून येते. त्यांच्यासाठी थेट मुंबईतून शिफारसींचा करण्यात आलेला ‘वर्षा’व हाच त्यांच्या नियुक्तीचा प्रमुख निकष ठरल्याचे दिसते. या नियुक्तीमुळे अनेक ठाणेदारांचा कामाचा उत्साह मावळला आहे. ‘डिस्करेज’ झाल्याची भावना त्यांच्यात पहायला मिळत आहे. जिल्ह्यात निरीक्षकांच्या दर्जाचे १६ ठाणे आहेत. यापैकी तब्बल ११ ठाणेदार कुलकर्णींना सिनीअर आहेत. शिवाय साईड ब्रँचचे निरीक्षक वेगळेच.
वैदर्भीय पोलीस अधिकारी उपेक्षितच
गृहमंत्री, गृहराज्यमंत्री विदर्भाचे असताना जिल्ह्यात वैदर्भीय पोलीस अधिकारीच उपेक्षित आहेत. एलसीबी प्रमुख, वणी ठाणेदार या ‘क्रीम पोस्ट’वर अनुक्रमे उस्मानाबाद व मुंबईचे अधिकारी आहेत. पांढरकवडा येथे वैदर्भीय अधिकारी असले तरी त्यांना ‘केंद्रीय’ पद्धतीने भाजपातूनच फटाके लावले जात आहे. जिल्हा वाहतूक शाखा ही महत्वाची ब्रँच आहे. मात्र तेथे मराठवाड्यातील सहायक पोलीस निरीक्षक ‘इन्चार्ज’ आहेत. हे बाहेरील अधिकारी स्थानिक पोलीस अधिकाºयांना मोजत नाहीत, त्यांना तुच्छ ठरवितात, मोठ्या प्रमाणात पैसा कमावतात व जाताना वैदर्भीयांना शिव्याशाप देऊन जातात, असाच गेल्या काही वर्षातील वैदर्भीय पोलीस अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. बाहेरील सत्ताधारी राजकीय नेतेसुद्धा आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर आपल्या ‘ज्येष्ठतेचा’ दबाव निर्माण करून आपल्या भागातील पोलीस अधिकाºयांसाठी लॉबींग करतात आणि वैदर्भीय नेतेसुद्धा आपल्या स्थानिक पोलीस अधिकारी बांधवांना ‘नाईलाज’ सांगत बाहेरच्यांना कुरवाळत असल्याचे विसंगत चित्र पहायला मिळते. त्यामुळेच वैदर्भीय सत्ताधारी नेत्यांविरोधात वैदर्भीय पोलीस अधिका
ऱ्यांमध्ये रोष पहायला मिळतो. वैदर्भीय पोलीस अधिकारी पश्चिम महाराष्ट्रात गेल्यास त्यांना संपूर्ण टर्म कंट्रोल रुम अथवा साईड ब्रँचला काढावी लागते, हे विशेष !