साहेब दुकाने उघडण्याची परवानगी द्या हो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:21+5:30
जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने सुरू असताना आमच्यावरच अन्याय का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. साहेब गेल्या अनेक दिवसांपासून आमची दुकाने बंद असल्याने आता परिवारासह उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे आम्हास त्वरित भाजीची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : साहेब आमची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या हो, अशी आर्त हाक येथी महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमधील भाजी विक्रेत्यांनी दिली. त्यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.
गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे आजपर्यंत या भाजी मार्केटमधील विक्रेत्यांची दुकाने बंद आहे. आता मात्र १ जूनपासून सर्वच दुकाने सुरू झाली. मात्र भाजी मार्केटमधील ४० भाजी विक्रेत्यांची दुकाने बंद आहे. त्यामुळे आपणाससुद्धा दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याकरिता भाजी विक्रेत्यांनी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, नगरसेवक सै.अक्रम सै.उमर, केतन रत्नपारखी यांच्या नेतृत्वात तहसीलदार राजेश वजीरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने सुरू असताना आमच्यावरच अन्याय का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. साहेब गेल्या अनेक दिवसांपासून आमची दुकाने बंद असल्याने आता परिवारासह उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे आम्हास त्वरित भाजीची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यावर तहसीलदार वजीरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवितो, असे सांगितले. उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, सै.अक्रम सै.उमर व केतन रत्नपारखी यांनी भाजी विक्रेत्यांच्या भावना तहसीलदारांसमोर विषद केल्या.
प्रशासनाला साकडे
शहरातील बहुतांश दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उघडली जात आहे. मात्र पूर्वी भाजी विक्रेते ज्या ठिकाणी दुकान लावत होते तेथे त्यांना दुकान लावण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या भाजी विक्रेत्यांनी पूर्वीच्याच ठिकाणी दुकाने लावू देण्याचे साकडे प्रशासनाला घातले आहे.