महिला सहकारी बॅंक अपहाराच्या तपासासाठी एसआयटी गठित
By सुरेंद्र राऊत | Published: August 22, 2024 06:21 PM2024-08-22T18:21:16+5:302024-08-22T18:21:47+5:30
आयपीएस रजनिकांत चिलुमुला प्रमुख : २४२ कोटींचा भ्रष्टाचार, २०६ आरोपींवर होणार कारवाई
यवतमाळ: येथील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत ३२ हजार सभासद व ठेवीदारांचे पैसे बुडाले आहेत. या कष्टाच्या पैशावर संगनमत करून संचालक मंडळ, सीईओ, सीए, व्हॅल्युअर यासह १४२ कर्जदारांनी डल्ला मारला. २४२ कोटींची रक्कम गडप केली, असा आरोप विशेष लेखा परीक्षण अहवालातून ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आयपीएस तथा दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी रजनिकांत चिलुमुला यांच्या नेतृत्वात विशेष तपास समिती गठित करण्यात आली आहे.
सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे लुबाडणाऱ्यांमध्ये अनेक प्रतिष्ठीतांवर आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास करताना मोठा राजकीय दबाव निर्माण होऊ शकतो, यापूर्वीही राजकीय दबावातूनच यातील आरोपींना पोलिसांकडून अभय देण्यात आले होते. गोरगरीब, सेवानिवृत्तांचा ठेवीस्वरूपात असलेला कष्टाचा पैसा कट रचून संगनमताने हडपला आहे. या सर्वांवर कठोर कारवाई करुन त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन गरीब ठेवीदार, सभासदांचे पैसे परत मिळावे, अशी अपेक्षा आहे. राजकीय पाठबळ असणाऱ्या बॅंकेतील ठगबाजांना पोलिस अटक करुन कारवाई करतील का असा प्रश्न आजही सामान्यांकडून व्यक्त होत आहे.
कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे विशेष लेखा परीक्षणाचा एक हजारांवर पानाचा अहवाल आहे. त्यामध्ये १४२ कर्जदारांसह तत्कालीन संचालक, बॅंक अधिकारी यासह २०६ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहे. हा अहवाल सुस्पष्ट असून त्या आधारेच पोलिस तपास केला जाणार आहे. या प्रकरणात निष्पक्ष व प्रामाणिकपणे चौकशी होऊन कारवाई होते काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अपहाराचे फॉरेन्सीक ऑडिट होणार
बॅंक अपहारावर विशेष लेखा परीक्षकांनी शिक्कामोर्तब करून २०६ जणांवर ठपका ठेवला आहे. आता या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी लेखा परीक्षण अहवालाचे पोलिसांकडून फॉरेन्सिक ऑडिट केेले जाणार आहे. या ऑडिटनंतर अटक व मालमत्ता जप्तीची कारवाई करता येणार आहे.
"कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. अपहारात गुंतलेल्या कुणालाही अभय मिळणार नाही. आरोपी संख्या मोठी असून या प्रक्रियेला वेळ लागणार, नि:ष्पक्षपणे या गुन्ह्याचा तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय करणार नाही."
- कुमार चिंता, जिल्हा पोलिस अधीक्षक, यवतमाळ