एसटीत बसा अन् सिनेमा पाहा, गाणीही ऐका !
By Admin | Published: May 23, 2017 01:18 AM2017-05-23T01:18:18+5:302017-05-23T01:18:18+5:30
खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी आता परिवहन महामंडळाने आधुनिक शक्कल लढविली आहे.
प्रवासी खेचण्याचा प्रयोग : जिल्ह्यातील १३४ बसेसमध्ये वायफाय सुविधा
अविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी आता परिवहन महामंडळाने आधुनिक शक्कल लढविली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १३४ बसेसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते कितीही खडबडीत असले आणि भंगार बसेसचा कितीही खडखडाट असला तरी, प्रवाशांना मोबाईलवर सिनेमा पाहायला मिळणार आहे.. अगदी फुकटात!
महामंडळाच्या बसेसकडे प्रवाशांचा ओढा वाढविण्यासाठी हा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून करण्यात आला आहे. यंत्र मीडिया सर्विसेसच्या माध्यमातून महामंडळाने एसटी बसेसमध्ये वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. १ ते १८ मेपर्यंत जिल्ह्यातील १३४ बसेसमध्ये वायफायचे छोटे उपकरण बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात यवतमाळ आगाराच्या ६२, दारव्हा आगाराच्या ३०, नेर आगाराच्या २५ आणि राळेगाव आगाराच्या १७ बसेसचा समावेश आहे. तर उर्वरित ५ आगारांच्या बसेसमध्येही हे काम लवकरच केले जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यातील सर्वच ५१० बसेसमध्ये वायफाय देण्यात येणार आहे. सध्या ज्या १३४ गाड्यांमध्ये वायफाय देण्यात आले, त्यातील बहुतांश बसफेऱ्या या अमरावती, नागपूर, नांदेड, पुणे, औरंगाबाद अशा लांब आणि मध्यम पल्ल्याच्या आहेत. मात्र, पुढील टप्प्यात जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांमध्येही वायफाय देण्यात येणार आहे.
एसटीत असे वापरा वायफाय
बस चालकाच्या बाजूने वायफायचे उपकरण बसविण्यात आले आहे. एसटीत चढता क्षणी प्रवाशाच्या मोबाईलवर वायफायचे ‘किवी’ हे आॅप्शन अॅक्टिवेट होईल. त्याला क्लिक करून आपला मोबाईल क्रमांक भरताच प्रवाशाचा मोबाईल वायफायशी कनेक्ट होईल. परंतु, जाणकारांच्या मते, हे वायफाय नसून हॉटस्पॉटचा प्रकार आहे. त्यामुळे अनलिमिटेड इंटरनेट सुविधा किंवा डाउनलोडिंगची सुविधा मिळणार नाही. केवळ महामंडळाने आधीच स्टोअर करून ठेवलेले सिनेमे आणि गाणी प्रवाशांना पाहता-ऐकता येईल.
बसस्थानकावर वायफाय दिल्यास ‘अनपेक्षित’ गर्दी वाढून सामान्य प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रवाशांकडून मागणी आल्यास बसस्थानकावरही निश्चितच वायफाय देण्यात येईल.
- मुक्तेश्वर जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी, यवतमाळ