यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात सहा शिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:45 PM2018-04-28T13:45:19+5:302018-04-28T13:45:28+5:30
वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील वडगाव परिसरातील जंगलात शिरलेल्या सहा शिकाऱ्यांना वन विभागाने मोठ्या शिताफीने शनिवारी पहाटे जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील वडगाव परिसरातील जंगलात शिरलेल्या सहा शिकाऱ्यांना वन विभागाने मोठ्या शिताफीने शनिवारी पहाटे जेरबंद केले. शिकाऱ्यांसोबत झालेल्या झटापटीत दोन वन अधिकारी जखमी झाले. या शिकाऱ्यांजवळून रायफल, काडतूसे, सत्तूर, चाकू आणि कार जप्त करण्यात आली.
दिग्रसपासून २० किलोमीटर अंतरावर वडगाव आहे. या परिसरातील जंगलात शिकारी शिरल्याची माहिती दिग्रसचे वन परिक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे यांना मिळाली. रात्रीच ते पथकासह जंगलात गेले. त्यावेळी त्यांना तीन वेळा बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्यांनी पथकासह आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा सहा शिकारी शिकार करण्याच्या तयारीत होते. या सशस्त्र शिकाऱ्यांवर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झडप घातली. त्यावेळी झालेल्या झटापटीत क्षेत्र सहायक गुलशर खान रहीम खान पठाण यांच्या छातीला शिकाऱ्याच्या हातातील सत्तूर लागला. तसेच वनरक्षक अश्विन मुजमुले जखमी झाले. जखमी अवस्थेतही सहा शिकाऱ्यांना जेरबंद करण्यात आले. निसार अजगर अली तंवर, शे. हुसेन शे. मेहबूब, म.सलीम हाजी अयुब तिघे रा. सावळी सदोबा व म. फारुक पारेख, म.हसीन अ. रज्जाक, शेख साजीद शेख गुलाम तिघे रा. कलगाव ता. दिग्रस यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून एक रायफल, दोन काडतूस, दोन सत्तूर, दोन चाकू, सहा मोबाईल, एक कार, तीन दुचाकी जप्त करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक भगवान पायघणे यांनी दिग्रसकडे धाव घेतली. ही कामगिरी क्षेत्र सहायक प्रकाश जाधव, अनिल सोनोने, वनपाल मोफीक अहेमद, संतोष जाधव, वनरक्षक गौतम बरडे, संतोष बदुकले, अनिल इंगोले, अयुब पठाण, अनिल राठोड, आमीर पठाण यांनी केली.