शिवसेनेचे सहा तर काँग्रेसचे पाच सभापती

By admin | Published: March 15, 2017 12:08 AM2017-03-15T00:08:57+5:302017-03-15T00:08:57+5:30

१६ पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने ...

Six members of Shiv Sena, Congress five | शिवसेनेचे सहा तर काँग्रेसचे पाच सभापती

शिवसेनेचे सहा तर काँग्रेसचे पाच सभापती

Next

पंचायत समिती : भाजपाला तीन जागांवर रोखले, राष्ट्रवादीकडे एक, तीन ठिकाणी ईश्वरचिठ्ठी, क्रॉस कनेक्शनची धूम
यवतमाळ : १६ पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक सहा जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. सेनेच्याच बरोबरीने काँग्रेसने तब्बल पाच पंचायत समित्या पटकावल्या. सत्तेचा सर्वाधिक फौजफाटा असलेल्या भाजपाला मात्र केवळ तीन पंचायत समित्यांवर आपला सभापती निवडून आणता आला. राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्यातील केवळ पुसद ही एकमेव पंचायत समिती राखता आली.
पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस कनेक्शन पाहायला मिळाले. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही पक्ष अनेक ठिकाणी कुठे एकमेकांच्या विरोधात तर कुठे साथीला होते. विशेष असे, परंपरागत भाजप-शिवसेना युती केंद्रात व राज्यात सत्तेत असली तरी पंचायत समित्यांच्या या निवडणुकीत हे दोनही पक्ष कुठेच एकत्र बसले नाहीत. शिवसेनेने तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. सर्वाधिक सहा पंचायत समित्यांमध्ये आपल्या पक्षाचा सभापती बसवून शिवसेनेने तेथे भगवा फडकविला. सेनेला उपसभापतिपदाच्याही तेवढ्याच जागा मिळाल्या. काँग्रेसला पाच सभापती तर तीन उपसभापती मिळविता आले. भाजपाला तीन सभापती बसविण्यात यश आले. बाभूळगाव येथील सभापतीची जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित होती. परंतु या संवर्गातून एकही उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहिली. तेथे उपसभापतिपद भाजपाकडे आहे. आता तेथे नव्याने सभापतिपदाचे आरक्षण काढले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे. मात्र तेथे हे नवे आरक्षण लांबणीवर टाकून उपसभापतीलाच प्रभारी सभापती म्हणून ट्रिट करण्याची राजकीय खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रभारी सभापतीच्या निमित्ताने भाजपाला चार पंचायत समित्या मिळाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बालेकिल्यातील पुसद ही एकमेव समिती राखता आली. दोन जागांवर या पक्षाचे उपसभापती निवडून आले.
पंचायत समित्यांमधील संख्याबळ पाहता अनेक ठिकाणी परंपरागत भाजपा-शिवसेना युती होवून या पक्षांना अधिकाधिक पंचायत समित्या आपल्याकडे राखता आल्या असत्या. मात्र या युतीत पालकमंत्रिपदाचे राजकारण शिरल्याने ही युती १६ पैकी कोणत्याही पंचायत समितीत दिसून आली नाही. उलट शक्य असेल तेथे शिवसेनेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुठे काँग्रेस तर कुठे राष्ट्रवादीची मदत घेतली. मग भाजपानेही शिवसेनेवर अवलंबून न राहता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साथीने आपले सभापती-उपसभापती बनविण्याचा प्रयत्न केला. या क्रॉस कनेक्शनच्या बळावर भाजपाने तीन सभापती व चार उपसभापती बनविले.
दिग्रस, उमरखेड व राळेगाव येथे समसमान जागांमुळे ईश्वरचिठ्ठी काढावी लागली. त्यातही शिवसेनेचीच सरशी झाली. दिग्रस व उमरखेड येथे ईश्वरचिठ्ठीने शिवसेनेला कौल दिला. राळेगावमध्ये काँग्रेसचा सभापती ईश्वरचिठ्ठीने निवडून आला.

Web Title: Six members of Shiv Sena, Congress five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.