सहा महिन्यात ‘शिवशाही’ पाच कोटीने तोट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:03 AM2018-02-27T11:03:23+5:302018-02-27T11:03:32+5:30

वातानुकुलित, आरामदायी, सुरक्षित असलेली ‘शिवशाही’ बस प्रवासी आकृष्ट करण्यात अपयशी ठरली आहे. ही बस महामंडळाच्या तोट्यात भर घालणारी ठरत आहे.

In six months 'Shivshahi' has earn deficit by five crores | सहा महिन्यात ‘शिवशाही’ पाच कोटीने तोट्यात

सहा महिन्यात ‘शिवशाही’ पाच कोटीने तोट्यात

Next
ठळक मुद्देकरारावर घेतलेल्या बसेसचे भाडे दीडपट जास्त

विलास गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वातानुकुलित, आरामदायी, सुरक्षित असलेली ‘शिवशाही’ बस प्रवासी आकृष्ट करण्यात अपयशी ठरली आहे. ही बस महामंडळाच्या तोट्यात भर घालणारी ठरत आहे. सहा महिन्याच्या काळात ‘शिवशाही’ पाच कोटीने तोट्यात आली आहे. इतर बसच्या तुलनेत असलेले अधिक भाडे, हे यामागील प्रमुख कारण सांगितले जाते. उत्पन्नाची परिस्थिती पाहता ‘एसटी’च्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या ‘शिवशाही’ला बे्रक लागतो की, कोटा पूर्ण केला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मालकीच्या आणि करारावर अशा एक हजार ५०० वातानुकुलित ‘शिवशाही’ बसेस एसटीच्या ताफ्यात आणण्याचे महामंडळाचे लक्ष्य आहे. सहा महिन्यांपूर्वी याची सुरुवात करण्यात आली. ४०० पेक्षा अधिक शिवशाही दाखल झाल्या. यात करारावर घेण्यात आलेल्या २०० बसेस आहेत. या बसेसला अधिक प्रवासी मिळावे, यासाठी महामंडळाने विविध प्रयोग सुरू केले. इतर बसेसच्या फेऱ्या कमी करणे, फलाटावर शिवशाही लागून असल्यास दुसऱ्या बसेस थांबविणे, असे अनेक प्रकार केले आणि केले जात आहेत. तरीही शिवशाही यात यशस्वी होऊ शकली नाही. इतर बसच्या तुलनेत शिवशाहीचे प्रवास भाडे दीड पट आहे. हीच बाब शिवशाहीच्या तोट्याला कारणीभूत ठरत आहे.
महामंडळाने जून २०१७ पासून करारावर घेतलेल्या बसेस शिवशाही नावाने सुरू केल्या. नोव्हेंबर २०१७ पर्यंतच्या उत्पन्नाचा आलेख पाहता या बसेस महामंडळाला तोट्यात आणत असल्याचे स्पष्ट होते. सहा महिन्यात पाच कोटी ३६ लाख ४१ हजार ६८१ रुपयांचा तोटा झाला आहे. उत्पन्न कमी असल्याने ‘थेट’चा आग्रह कमी करून टप्पा वाहतूकही सुरू करण्यात आली. तरीही लालपरी, हिरकणीच्या तुलनेत शिवशाहीचे उत्पन्न कमीच आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते के.व्ही. शेट्टी यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीतून उत्पन्न आणि खर्चाची बाजू स्पष्ट झाली आहे.
विशेष म्हणजे करारावर घेण्यात आलेल्या वातानुकुलीत बसचेच उत्पन्न आणि खर्चाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. महामंडळाच्या वातानुकुलीत बसच्या उत्पन्नाची स्थिती यापेक्षा वेगळी नसावी, असे सांगितले जाते.

उत्पन्न १४ कोटी,  खर्च २० कोटी
जून २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या सहा महिन्याच्या कालावधीत शिवशाहीचे उत्पन्न १४ कोटी ६९ लाख २५ हजार ४४१ रुपये आहे. खर्चाचा आकडा यापेक्षा अधिक आहे. २० कोटी पाच लाख ६७ हजार १२२ रुपये एवढा खर्च या बसवर झाला आहे. इंधनावर दहा कोटी ४९ लाख सहा हजार २१५ रुपये खर्च झाले आहे. दोन कोटी ५१ लाख दोन हजार १७ रुपये पथकरापोटी चुकविण्यात आले आहे. करारापोटी सहा कोटी २४ लाख ७७ हजार ९११ रुपये संबंधित कंपनीला देण्यात आले आहे. शासनाला प्रवासी कराच्या रूपात ८० लाख ८० हजार ८९९ रुपये देण्यात आले आहे.

Web Title: In six months 'Shivshahi' has earn deficit by five crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.