अपंग प्रमाणपत्रासाठी सहा महिने ‘वेटिंग’
By admin | Published: January 17, 2015 12:13 AM2015-01-17T00:13:38+5:302015-01-17T00:13:38+5:30
शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक अपंग प्रमाणपत्रासाठी एक-दोन नव्हे तब्बल सहा महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उंबरठे अपंग झिजवित आहे.
सुरेंद्र राऊत यवतमाळ
शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक अपंग प्रमाणपत्रासाठी एक-दोन नव्हे तब्बल सहा महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उंबरठे अपंग झिजवित आहे. मात्र त्या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे दिली जाते.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस वैद्यकीय मंडळ उपलब्ध असते. नियोजित दिवशी जिल्हाभरातून अपंग आॅनलाईन नोंदणीसाठी येतात. या आॅनलाईन नोंदीच्या प्रक्रियेत प्रथम अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्यांवर अन्याय होत आहे. १४ जानेवारीला अन्सार दौलत खान रा. वसंतनगर पुसद हा पायाने अपंग असलेला युवक वैद्यकीय मंडळा पुढे हजर झाला. मात्र त्याला तब्बल सहा महिन्यानंतर जून महिन्यात तपासणीसाठी येण्याची तारीख देण्यात आली. अन्सारची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अन्सार सारखीच अनेकांची परिस्थिती आहे. अपंगत्व तपासणीसाठी तासन्तास रांगेत असतात. जेव्हा डॉक्टरांपुढे अपंग हजर होतो तेव्हा त्याला पुढची तारीख दिली जाते. ही तारीख म्हणजे काही आठवड्याची नव्हे तर चक्क सहा-सहा महिन्याची असते. प्रमाणपत्र तपासणी झालेल्या दिवशीच करण्यात येईल, याची खातरजमा वैद्यकीय मंडळाच्या सदस्य, सचिव यांनी करावी असे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही प्रमाणपत्रासाठी हेळसांड केली जात आहे. अन्सार दौलत खान याने याबाबत तक्रार अधिष्ठाताकडे केली. त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही.
दोन भावंडांचे अपंगत्वच नाकारले
झरीजामणी तालुक्यातील पाटणबोरी येथील सै. शहारूख सै. रोशन (१४) आणि मोहसिन रोशन सैय्यद (१६) या दोन अपंग भावांनी प्रामणपत्रासाठी वैद्यकीय मंडळापुढे अर्ज केला. तपासणीसाठी त्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून चकरा मारल्या. तपासणीनंतर ९ जानेवारी रोजी त्या दोघांचेही अपंगत्व नाकारले आहे. जन्मताच दोघेही भाऊ पायाने चालणे तर सोडाच बसूही शकत नाही. अशाही स्थितीत अपंगत्व कुठलेही कारण न देता नाकारण्याचा प्रताप वैद्यकीय मंडळाने केला आहे. याप्रमाणेच महागाव तालुक्यातील सवना येथील शेख साफी यालासुद्धा अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले नाही. हे प्रमाणपत्र का नाकारण्यात येत आहे. याचा कुठलाही खुलासा वैद्यकीय मंडळाने अद्यापपर्यंत केला नाही.