सहा नगरपंचायतीत सरासरी 80 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:00 AM2021-12-22T05:00:00+5:302021-12-22T05:00:21+5:30
जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतींत मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत केवळ ७.८४ टक्के इतके मतदान झाले. थंडी कमी झाल्यानंतर मात्र मतदानाचा टक्का वाढत गेला. ११.३० पर्यंत २०.१५ टक्क्यांवर मतदान गेले होते. त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत मतदानाचा टक्का ३७.८० वर गेला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५७.८५ टक्के मतदान नोंदविले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींत मंगळवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले. ८४ जागांसाठी सहा नगरपंचायतींत ४३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा नगरपंचायतीत सुमारे १५ टक्क्याने मतदान वाढले असून, या वाढीव मतदानाचा कोणाला फायदा मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. निकालासाठी मात्र २९ दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतींत मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत केवळ ७.८४ टक्के इतके मतदान झाले. थंडी कमी झाल्यानंतर मात्र मतदानाचा टक्का वाढत गेला. ११.३० पर्यंत २०.१५ टक्क्यांवर मतदान गेले होते. त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत मतदानाचा टक्का ३७.८० वर गेला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५७.८५ टक्के मतदान नोंदविले गेले. त्यानंतर मात्र मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे शेवटच्या दोन तासांत मोठ्या संख्येने मतदान झाल्याने मतदानाचा टक्का ८० टक्क्यांवर पोहोचला. या सहा नगरपंचायतींत मागील निवडणुकांत सरासरी ६५ टक्के इतके मतदान झाले होते. त्या तुलनेत १५ टक्के मतदानात वाढ झाली आहे. प्रमुख पक्षांनी यंदा स्वबळ आजमावल्याने निवडणुकीत चुरस वाढल्याचे दिसून आले. बहुतांश ठिकाणी कोविड नियमांचे पालन करीत नागरिक मतदान करीत होते. तर काही ठिकाणी गर्दीमुळे हे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून आले. ढाणकी नगरपंचायतीत दोन जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. येथे ७७.९८ टक्के मतदान झाले आहे.
राळेगाव नगरपंचायतीत ७३.७९, झरी नगरपंचायतीत ८८.३२, महागाव नगरपंचायतीत ८०.६४, मारेगाव ८०.९८, कळंब ७६.१९ तर बाभूळगाव नगरपंचायतीत ८१.७५ टक्के मतदान झाले आहे. २०१५-१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीत सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा सरासरी १५ टक्क्याने मतदान वाढले आहे. राळेगाव नगरपंचायतीत १४ जागांसाठी ८२, कळंब १३ जागांसाठी ६३, महागाव १३ जागांसाठी ९१, मारेगाव १४ जागांसाठी ९०, झरी जामणी १७ जागांसाठी ८७ तर बाभूळगाव नगरपंचायतीत १३ जागांसाठी ६२ उमेदवारांनी निवडणूक लढविली.
भर थंडीत ज्येष्ठांचा उत्साह
- नगरपंचायतीत काम करणारे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनीही भरभरुन मतदान केले. मंगळवारी तापमान ९ अंशापर्यंत घटलेले असतानाही वयोवृद्धांनी मतदानासाठी कडाक्याच्या थंडीत मतदान केंद्र गाठले होते. शहरात विकास कामे व्हावी यासाठी त्यांची धडपड दिसली.
अत्यल्प लोकसंख्या असलेल्या झरी नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले. येथील निवडणूक अत्यंत अटी-तटीची ठरली. सहाही नगरपंचायतींकरिता झालेल्या मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे.
महागावात दोन गट आले होते आमनेसामने
- महागावच्या प्रभाग क्र. ८ करिता बचत भवनात मतदान सुरू असताना एका गटाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गटाकडून त्याबाबत आक्षेप घेतला गेला. त्यावरून केंद्राच्या गेटवरच दाेन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. व्यंकट राठोड यांनी पोलीस बंदोबस्त वाढविल्याने वाद निवळला. ठाणेदार विलास चव्हाण, उमेश भोसले यांनी हस्तक्षेप करून मतदान केंद्रावर शांतता प्रस्थापित केली.