गोवा ट्रीपसाठी सहा जणांनी चक्क फायनान्स कंपनी प्रतिनिधीला लुटले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:33 IST2025-01-08T18:32:22+5:302025-01-08T18:33:47+5:30

आरोपींना अटक : वाटमारीच्या गुन्ह्यातील दीड लाखाचा ऐवजही जप्त

Six people robbed a finance company representative for a Goa trip! | गोवा ट्रीपसाठी सहा जणांनी चक्क फायनान्स कंपनी प्रतिनिधीला लुटले !

Six people robbed a finance company representative for a Goa trip!

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
दारव्हा मार्गावरील उमरडा नर्सरी घाटात भारत फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीला डोळ्यांत मिरची पूड टाकून सहा जणांनी लुटले. याप्रकरणी ३० जानेवारी रोजी लाडखेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात वाटमारीचा गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख ६२ हजारांचा ऐवज जप्त केला. आरोपींना गोवा ट्रीपसाठी वाटमारी केल्याचे पोलिस तपासातून उघड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रपरिषदेतून दिली.


कुणाल बापूराव चवरे (२३, रा. ईदीरानगर, बाभूळगाव), निखिल बळीराम राऊत (२३, रा. बुटले ले आऊट, पिंपळगाव, यवतमाळ), अर्पित दीपक ठोसरे (१९, रा. वार्ड क्र. ४, पिंपळगाव, यवतमाळ), यश माणिकराव थूल (२३, रा. कोठा (वेणी) ता. कळंब), संस्कार शरद चौधरी (१८, रा. यावली (मावली) ता. बाभूळगाव), विवेक गजानन कोडापे (१८, रा. नागरगाव, ता. बाभूळगाव), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी गोव्याला जाण्यासाठी लूटमार करण्याचा बेत आखला. त्यानंतर भारत फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी शुभम वसंतराव दर्यापूरकर याच्यावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग केला. 


शुभमने दिघोरी कामठवाडा, चाणी येथील बचत गटांकडून पैसे वसूल करून तो ३० डिसेंबर रोजी यवतमाळकडे येत असताना त्याला उमरडा नर्सरीजवळ अज्ञात सहा जणांनी अडवून त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यानंतर एक लाख ७० हजार रुपये रोख असलेली बॅग, दोन टॅब, दोन बायोमेट्रिक मशीन, असा एकूण एक लाख ८७ हजार ३३५ रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला. हा गुन्हा करून आरोपी थेट गोवा येथे पसार झाले. पोलिसांच्या सायबर टीमने घटनास्थळावरील डमडाटा काढला, तर एलसीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. सहा आरोपी गोवा येथून परत आल्यानंतर त्यांना अटक केली. विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या जवळून गुन्ह्यातील एकूण एक लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 


आयटीआयमध्ये झाली तिघांची मैत्री 

  • गुन्ह्यातील निखील राऊत, कुणाल चवरे व मास्टर माइंड या तिघांची आयटीआयला असता मैत्री झाली. नंतर ते संपर्कात होते. ३० डिसेंबरचा कट तिघांनी रचला. उर्वरित तिघांना आमिष देऊन गुन्ह्यात सहभागी केले. 
  • ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी चिलूमुला रजनिकांत यांच्या मार्गद- र्शनात पोलिस निरीक्षक सतीश चवरे, सहायक निरीक्षक विजय महाले, विशाल हिवरकर, सैय्यद साजिद, जमादार बबलू चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, अमित कुमरे, सायबर सेलचे प्रणय ईटकर, प्रगती काबंळे, उमेश शर्मा, जयंता शेंडे, नितीन सलाम यांनी केली.


फायनान्सचा माजी कर्मचारी आहे मास्टरमाइंड 

  • वाटमारीच्या गुन्ह्यात भारत फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधींची टीप कुणी दिली, याचा शोध पोलिसांना लागला. अटकेतील आरोपींनी त्या मास्टरमाइंडचे नाव पोलिसांना सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी हा मास्टरमाइंड भारत फायनान्स कंपनीत कामाला होता. 
  • त्यानेच वाटमारीच्या गुन्ह्याचा कट रचला. वसुली केलेले प्रतिनिधी रोख घेऊन कोठून कधी येतात, याची पुरेपूर माहिती दिली. त्यानंतरच संधी मिळताच सहा जणांनी दोन दुचाकीवरून जात प्रतिनिधींच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून त्यांच्याजवळची रोख हिसकावून घेतली. 
  • मोबाइल वापरामुळे अडकले आरोपी. घटनास्थळी लूटमार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. ते लाडखेड फाट्यावरून मालखेड येथे पोहोचले. या प्रवासादरम्यान एका दुचाकीला अपघात झाला. त्यात तिघे जण जखमी झाले. याच अवस्थेत ते राणीअमरावती येथे पोहोचले. तेथून कार भाड्याने घेऊन ३० डिसेंबरच्या रात्रीच सहाही जण गोव्याकडे पसार झाले. त्यांच्यासोबत मास्टरमाइंड नव्हता. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

Web Title: Six people robbed a finance company representative for a Goa trip!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.