सहा पिस्टल, बारा काडतूस जप्त, सहा तस्करांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 09:46 PM2018-02-01T21:46:03+5:302018-02-01T21:46:29+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी पिस्टल घेऊन विक्रीसाठी यवतमाळात आला असताना त्याला बुधवारी रात्री नागपूर रोडवर रंगेहात अटक करण्यात आली. यात काँग्रेस नगरसेवकासह मंडी टोळीतील तीन गुंडांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी पिस्टल घेऊन विक्रीसाठी यवतमाळात आला असताना त्याला बुधवारी रात्री नागपूर रोडवर रंगेहात अटक करण्यात आली. यात काँग्रेस नगरसेवकासह मंडी टोळीतील तीन गुंडांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
रवींद्र ऊर्फ रवी गणेश उमाळे (३५) रा.टुणकी (ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा), काँग्रेस नगरसेवक सलीम शहा सुलेमान शहा ऊर्फ सलीम सागवान (रा.यवतमाळ), मंडी टोळीतील राम ऊर्फ चिमणलाल शर्मा, नीलेश धरमदास सोनोरे, चंद्रप्रकाश ऊर्फ तातू रमाकांत मुराब (सर्व रा.यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत. टोळीविरोधी पथकाचे उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी एमआयडीसी परिसरात संग्रामपूर येथून देशी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या गजानन ठाकरे याला अटक करून दोन पिस्टल जप्त केल्या होत्या. मात्र मुख्य सूत्रधार रवी उमाळे पसार होण्यात यशस्वी झाला होता.
या घटनेपासून रवी उमाळे याच्यावर टोळीविरोधी पथकाची पाळत होती. गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, संतोष मनवर व त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ७ वाजता आरटीओ कार्यालयामागील भाग्यनगर ते मल्हारनगर दरम्यान गुलिस्ता ले-आऊटच्या रोडवर सापळा रचला. येथे आरोपी रवी उमाळे हा सहा देशी पिस्टल व १२ काडतूस विक्रीसाठी घेऊन आला होता. व्यवहार सुरू असतानाच पोलीस पथकाने धाड टाकली. यावेळी पाचही आरोपींकडून एक-एक पिस्टल जप्त करण्यात आली, तर नगरसेवक सलीम शहा याच्या दुचाकीच्या डिक्कीतून एक पिस्टल जप्त केली. सहा देशी कट्टे व १२ जिवंत काडतूस आणि एक अर्धवट जळालेले काडतूस, असा तीन लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे देशी पिस्टलची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आल्याचे एम. राज कुमार यांनी सांगितले. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून याचा धसका गुन्हेगारी वर्र्तुळाला निश्चित बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी एसडीपीओ पीयूष जगताप, एलसीबी प्रमुख मुकुंद कुळकर्णी, पीएसआय संतोष मनवर उपस्थित होते. टोळीविरोधी पथकातील ऋषी ठाकूर, संजय दुबे, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, विनोद राठोड, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, जयंत शेंडे, श्री शिंदे यांनी केली.
खरेदी पाच हजारांत, विक्री ६० हजारांत
देशी पिस्टलची निर्मिती मध्यप्रदेशात केली जाते. तेथे अतिशय कमी दरात पाच हजारात एक कट्टा मिळतो. त्याची यवतमाळात १५ ते २० हजारांत विक्री केली जाते. नंतर हे खरेदीदार हाच कट्टा ५० ते ६० हजार रुपयांत विकतात. दामदुप्पट रक्कम मिळत असल्याने यात शहरातील अनेकजण अडकले आहे. त्यांचा शोध घेतल्यास शहरातून मोठ्या प्रमाणात देशी कट्टे बाहेर निघण्याची शक्यता आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.