पार्डीत लग्न घरातूनच निघाल्या सहा तिरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:36 PM2018-12-25T22:36:04+5:302018-12-25T22:36:28+5:30
ज्या घरातून आनंदाने नवरदेवाची वरात निघणार होती, त्याच घरातून मंगळवारी सहा तिरड्यांची अंत्ययात्रा निघाली. पार्डी (सुकळी) येथील हे दृश्य बघून सर्वांचेच काळीज हेलावले.
गजानन अक्कलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : ज्या घरातून आनंदाने नवरदेवाची वरात निघणार होती, त्याच घरातून मंगळवारी सहा तिरड्यांची अंत्ययात्रा निघाली. पार्डी (सुकळी) येथील हे दृश्य बघून सर्वांचेच काळीज हेलावले.
कळंब-यवतमाळ मार्गावरील चापर्डानजीक सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरच्या अपघातात दहा जणांचे बळी गेले. मृतक पार्डी येथून यवतमाळ येथील वाघापूर येथे साक्षगंधासाठी गेले होते. परत येताना काळाने त्यांच्या वाहनावर घाला घातला. यात वरपित्यासह त्याची आई व इतर आप्तस्वकीय मृत्यू पावले. शासकीय सोपस्कारानंतर मंगळवारी सर्व मृतदेह पार्डी येथे आणण्यात आले. लग्न घरातूनच या सर्वांची अंत्ययात्रा निघाली. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. या अपघाताने गावासह पंचक्रोशीवरच शोककळा पसरली. साक्षगंधाचा आनंद क्षणातच हरविल्याने सर्वांनाच हूरहूर लागली.
बुधवारी सचिन बाबाराव पिसे, रमेश पुंडलिक थूल, सुशीला रमेश थुल, तानबाजी पुंडलिक थूल, सुनील तानबाजी थूल, अपर्णा प्रशांत थूल, सक्षम प्रशांत थूल या सात जणांच्या मृतदेहावर पार्डीतील मोक्षधामात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी अंत्ययात्रा बौद्ध विहारात नेण्यात आली. तेथील प्रार्थना झाल्यानंतर अखेरच्या प्रवासाला प्रारंभ झाला. थूल परिवाराच्या दु:खाने सर्वांनाच गहिवरून आले होते. मोक्षधामात शोकसभा घेऊन मृतांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच सोमवारी रात्रीपासूनच नातेवाईकांनी पार्डीकडे धाव घेतली होती.
अशीच स्थिती पिंपळगाव येथे होती. तेथे सोनाली शैलेष बोंदाडे, सानिका शैलेष बोंदाडे यांची सामूहिक अंत्ययात्रा काढून अंतिम संस्कार करण्यात आले. पार्डी व पिंपळगाव येथे उपस्थित नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. जानराव विष्णू झामरे यांच्या पार्थिवावर आसेगाव ता. चांदूररेल्वे येथे अंत्यसंस्कार झाले.
दरम्यान आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पार्डी येथे भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला. उईकेंच्या विनंतीवरून पालकमंत्री मदन येरावार यांनीही मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
आई आणि मुलगा एकाच तिरडीवर
अपघातात अपर्णा प्रशांत थूल आणि त्यांचा सहा वर्षीय चिमुकला सक्षम ठार झाले. या दोघांचीही एकाच तिरडीवर अंत्ययात्रा काढण्यात आली. हे दृश्य बघून सर्वांचेच मन हेलावले. न कळत डोळ्यांमधून अश्रू वाहिले. दरम्यान आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी सोमवारी रात्रीपासून मंगळवारी अंत्ययात्रेपर्यंत सर्व व्यवस्था सांभाळली. विशेष म्हणजे या अपघातात ठार झालेला चालक सचिन याने २१ डिसेंबरलाच मित्राकडून क्रुझर वाहन विकत घेतले होते. अवघ्या चारच दिवसानंतर हा अपघात घडला.