वॉटरकप स्पर्धेत सहा तालुके उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 09:47 PM2017-11-28T21:47:42+5:302017-11-28T21:48:43+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यात या स्पर्धेत सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले हक्काचे पाणी कमाविण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि पाणी फाऊंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पधेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जयंत देशपांडे, संदीपकुमार अपार, स्वप्नील कापडनीस, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सुभाष मानकर आदी उपस्थित होते.
गतवर्षी या स्पर्धेत जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश होता. यावर्षीच्या स्पर्धेत राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी आणि दारव्हा या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा तालुक्यातील १०८ गावांचा समावेश जलयुक्त शिवारमध्ये आहे. त्यामुळे ही १०८ गावे १०० टक्के सहभागी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यवतमाळचा वॉटर कप यावर्षी निश्चितच वेगळा असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप संदर्भात यावषीर्ची पहिली बैठक यवतमाळमध्ये होत आहे. या माध्यमातून चांगली माणसे जोडून चांगल्या समाजाची निर्मिती हेच ध्येय आहे. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याला एक चांगले नेतृत्व लाभले आहे. प्रशासन, समाज आणि पाणी फाऊंडेशनचे समन्वयक यांच्या प्रयत्नातून यवतमाळ जिल्हा या स्पर्धेत प्रथम येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामविकास दूत, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक आदी उपस्थित होते.