जिल्ह्यात ‘चोर मचाये शोर’.. २४ तासात उडविले पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 05:37 PM2022-02-18T17:37:58+5:302022-02-18T17:52:46+5:30

मागील २४ तासात शहरी व ग्रामीण भागात चोरीच्या तब्बल सहा घटना घडल्या आहेत. यात यवतमाळ शहरातील तीन लाख २८ हजारांची घरफोडी, तीन दुचाकी चोरी, धान्य गोदामातून धान्य लंपास व कृषिपंपाचीही चोरी समाविष्ट आहे.

six theft cases reported in 24 hours in yavatmal | जिल्ह्यात ‘चोर मचाये शोर’.. २४ तासात उडविले पाच लाख

जिल्ह्यात ‘चोर मचाये शोर’.. २४ तासात उडविले पाच लाख

Next
ठळक मुद्दे सहा ठिकाणी घटना तीन दुचाकी, एक घरफोडी, धान्य चोरी, कृषी साहित्यावरही डल्ला

यवतमाळ : जिल्ह्यात चोर मचाये शोर अशी अवस्था निर्माण झाली आहे. मागील २४ तासात शहरी व ग्रामीण भागात चोरीच्या तब्बल सहा घटना घडल्या आहेत. यात यवतमाळ शहरातील तीन लाख २८ हजारांची घरफोडी, तीन दुचाकी चोरी, धान्य गोदामातून धान्य लंपास व कृषिपंपाचीही चोरी समाविष्ट आहे. असा एकूण चार लाख ७१ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला. चोरट्यांना पोलिसांचे कोणतेच भय राहिलेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिक वैतागला आहे.

यवतमाळातील अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीत सिंचननगर येथून वैभव रामभाऊ नाकट यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी पळविली. त्याच रात्री दरम्यान भोसा रोड सव्वालाखे ले-आऊट येथील नितीन कैथवास यांच्या घरून तीन लाख २८ हजारांची रोख चोरून नेली. यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरंगा चौकातून सुरक्षा रक्षक सिद्धेश्वर दुधे याची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. स्टेट बँक चौकातून पुंडलिक आडे रा. बाजाेरियानगर यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली.

शहरात चोरटे धुमाकूळ घालत असतानाच ग्रामीण भागातही सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे. महागाव तालुक्यातील माेरथ येथे अमोल रामदास तगडपल्लेवार यांच्या गोदामातून २५ हजार रुपये किमतीची तूर चोरीला गेली. महागाव तालुक्यातील वाकोडी शेतशिवारातील अजिंक्य गणेश रचकुंटवार यांच्या शेतातून ३८ हजार रुपये किमतीचा कृषिपंप व इतर साहित्य चोरीला गेले. चोरटे शिरजोर झाल्याने मालमत्ता व रोख सुरक्षित कशी ठेवायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात चोरीचा गुन्हा उघड झालेला नाही. चोरटे मनमर्जीने हात साफ करीत आहे. पोलीस केवळ गुन्हा नोंदविण्यापुरतेच आहे का, तपासाची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

चोरीच्या गुन्ह्यांची निर्गती नाही

चोरीच्या गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तपास पूर्ण केला जात नाही. तपास अधिकारी अ फायनल असा शेरा देत अंतिम अहवाल सादर करतो. गुन्हा कायम तपासावर ठेवून तपास अधिकारी स्वत:ची सुटका करून घेतो. गेल्या वर्षभरात चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात हा प्रकार वाढला आहे. गुन्हा उघडच झाला नाही, असे सांगून पोलीस आपली एकप्रकारे जबाबदारीच झटकत आहे.

Web Title: six theft cases reported in 24 hours in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.