घरासमोर खेळणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:51 PM2022-01-06T17:51:15+5:302022-01-06T18:07:05+5:30
घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताची नजर पडली. त्याने तिला घरात नेऊन अत्याचार केला. हा प्रकार आजीने बघितल्यामुळे उघड झाला.
यवतमाळ : नराधमांच्या नजरेतून महिला, मुली सुरक्षित नाहीत याचा पुन्हा प्रत्यय आला. शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर तेथीलच एका विकृताची नजर पडली. त्याने तिला घरात नेऊन अत्याचार केला. हा प्रकार आजीने बघितल्यामुळे उघड झाला. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्वप्नील खारवडे (२२) असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी दुपारी घरासमोर सायकलवर खेळत असलेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीला स्वत:च्या घरी नेले. घरासमोर खेळणारी मुलगी अचानक दिसेनाशी झाली म्हणून आजीने तिचा शोध घेणे सुरू केले. आजी शोध घेत आरोपी स्वप्नीलच्या घरी पोहोचली. पुढचे दृश्य पाहून आजीला धक्काच बसला. स्वप्नील चिमुकलीवर अत्याचार करत होता.
आजीने त्याच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली व तिला घरी आणले. हा प्रकार घडल्यानंतर आरोपीने गयावया करत माफी मागितली. आरोपीच्या आई-वडिलांनीसुद्धा पोलिसांत जाऊ नका, मुलाचे नुकसान होईल, चूक झाली असे म्हटले. मात्र, मुलीला वेदना होत होता. हा प्रकार मुलीच्या आईने तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी या घटनेची अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
पोलिसांनी याप्रकरणी कलम ३६६ (अ), ३७६ (अ)(ब), ३७६(२) भादंवि, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.