घोंसरा येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:38 AM2021-07-26T04:38:10+5:302021-07-26T04:38:10+5:30

महागाव : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील घोंसरा येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब अचानक कोसळला. ही घटना शनिवारी रात्री घडली. या ...

The slab of Zilla Parishad school at Ghonsara collapsed | घोंसरा येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला

घोंसरा येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला

googlenewsNext

महागाव : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील घोंसरा येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब अचानक कोसळला. ही घटना शनिवारी रात्री घडली. या शाळेचे बांधकाम २००४-०५ दरम्यान झाल्याची माहिती आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत घोंसरा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकांच्या खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. संबंधित कंत्राटदार आणि कामावर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी बांधकामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कामात अनियमितता झाल्याचे आता उघड होत आहे.

सध्या कोरोनामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. त्यामुळे या घटनेत विद्यार्थी व शिक्षकांना दुखापत झाली नाही. मात्र, संबंधित बांधकाम कंत्राटदार आणि अभियंता यांनी यासंदर्भात दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व शाळांच्या बांधकामाची आता चौकशी करण्याची गरज आहे.

जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे पटसंख्याही घटताना दिसत आहे. शाळेची परिस्थिती योग्य असल्यास विद्यार्थी स्वतःहून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतात; परंतु अलीकडच्या काळात मात्र पालक जिल्हा परिषद शाळेत आपला पाल्य शिकविण्यास तयार होताना दिसत नाही. अशा घटना घडत असल्याने जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे.

बॉक्स

घटनेची चौकशी व्हावी

मुख्याध्यापकांच्या खोलीचा स्लॅब रात्री कोसळल्याने विद्यार्थ्यांना किंवा आम्हाला इजा झाली नाही; परंतु संबंधित बांधकाम कंत्राटदार व या कामाची देखरेख करणारे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. या घटनेची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रभारी मुख्याध्यापक दिगंबर साबळे यांनी केली आहे.

Web Title: The slab of Zilla Parishad school at Ghonsara collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.