२०० सागवान वृक्षांची कत्तल
By admin | Published: July 8, 2014 11:41 PM2014-07-08T23:41:18+5:302014-07-08T23:41:18+5:30
एक, दोन नव्हे तर तब्बल दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकूडसाठा वाहनाद्वारे लंपास केला. हा गंभीर प्रकार हिवरी
आंध्र प्रदेशात तस्करी : राखीव वनातून ४० लाखांचे लाकूड लंपास
यवतमाळ : एक, दोन नव्हे तर तब्बल दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकूडसाठा वाहनाद्वारे लंपास केला. हा गंभीर प्रकार हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर, मनदेव, किन्ही आणि खरद राखीव वनात उघडकीस आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी होण्याची ही यवतमाळ वनवृत्तातील बहुधा पहिलीच घटना असावी.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी यवतमाळ वनविभागात येणाऱ्या हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर, मनदेव, किन्ही आणि खरद शिवारात तस्करांनी २०० वर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल केली. तसेच काही वरवर परिपक्व दिसत असल्याने त्यांच्यावरही कुऱ्हाड चालविण्यात आली. मात्र अर्धाभाग कापल्यानंतर ते पोकळ असल्याचे निदर्शनास येताच ते वृक्ष न कापता तसेच सोडून देण्यात आले. हा गंभीर प्रकार स्थानिक नागरिक व गुराख्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती हिवरी वनपरिक्षेत्रातील क्षेत्रसहायक, वनरक्षक आणि चौकीदारांना दिली. मोक्का पाहणीत दोनशेवर सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे आणि लाखो रूपयांच्या लाकडाची तस्करी झाल्याचे पाहून वनकर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तातडीने संशयितांची व चोरट्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एक क्षेत्रसहाय्यक आंध्र प्रदेशातील आदिलाबादपर्यंत जावून आला. त्यानंतर त्याने घटनेची आणि संशयिताची माहिती हिवरी वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एच. मोहिते यांना दिली. तसेच चौकशी करण्यासाठी परवानगी देण्याची गळही घातली. मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांनी त्यांना चौकशीची परवानगी न देता हा प्रकार दडपण्यास बाध्य केले. त्यामुळे ही कत्तल उघडकीस येवून अनेक दिवस उलटल्यानंतरही कुठलीच कारवाई झाली नाही.
हा प्रकार स्थानिकांनी प्रसार माध्यमांच्या लक्षात आणून दिला. याची कुणकूण लागताच बिंग फुटून कारवाई होईल, या भीतीने आरएफओ मोहिते यांनी तस्करी झालेल्या वृक्षांच्या थूटावर हॅमर मारून तत्काळ पीओआर फाडण्याचे आदेश दिले. त्यावरून ६ आणि ७ जुलैला कत्तलीची साक्ष देणाऱ्या सागवान वृक्षांच्या थूटांवर हॅमर मारले.
तसेच हॅमर मारून घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. त्यावरून ८ जुलैला यवतमाळ वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा तेथे धडकले. त्यांनी हा गंभीर प्रकार पाहून आरएफओ मोहिते आणि वन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. २०० वर सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठा लंपास करणे हे काही एक दोन दिवसाचे काम नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
क्षेत्रसहायकासह चौकीदारावर संशयाची सुई
हिवरी वनपरिक्षेत्रात कार्यरत एक क्षेत्रसहाय्यक नुकताच यवतमाळ वनपरिक्षेत्रातून तेथे बदलीवर गेला. यवतमाळा वनपरिक्षेत्रात रूजू होण्यापूर्वी तो हिवरी वनपरिक्षेत्रातच कार्यरत होता. या दोन वनपरिक्षेत्रा पलिकडे त्याने कुठेही सेवा दिली नाही. त्याचे तस्करांशी आर्थीक हितसंबंध असल्याचे अनेकदा उघड झाले. काही महिन्यांपूर्वीच हिवरी वनपरिक्षेत्रात रूजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांनाही त्याने कचाट्यात घेतले आहे. शिवाय दोन खास चौकीदारही त्याच्या या गोरखधंद्यात सामील असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.