बंदी भागातले चिमुकले सीआयडी झाले राज्यभर फेमस; बिटरगावचा उपक्रम एमपीएसपीद्वारे सर्वत्र पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:21 AM2023-03-17T11:21:28+5:302023-03-17T11:24:51+5:30

गुणी शिक्षक, गुणवंत शाळा : या शाळेने सुरू केलेले सीआयडी, एसआयटी उपक्रम अत्यंत विशेष ठरले आहेत

Small CIDs from banned areas became famous across the state; Bittargaon initiative reached everywhere through MPSP | बंदी भागातले चिमुकले सीआयडी झाले राज्यभर फेमस; बिटरगावचा उपक्रम एमपीएसपीद्वारे सर्वत्र पोहोचला

बंदी भागातले चिमुकले सीआयडी झाले राज्यभर फेमस; बिटरगावचा उपक्रम एमपीएसपीद्वारे सर्वत्र पोहोचला

googlenewsNext

अविनाश साबापुरे

यवतमाळ : पैनगंगा अभयारण्याच्या कोअर क्षेत्रातील जंगलव्याप्त बिटरगाव या खेड्यातील शाळेने विद्यार्थ्यांमधून ‘चिमुकले सीआयडी’ निर्माण केले. शाळेच्या शिस्तीवर करडी नजर ठेवणारे हे लहान-लहान सीआयडी पोलिस आता राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत फेमस झाले आहेत. बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील शाळेचा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने एका पुस्तिकेद्वारे हजारो शाळांपर्यंत पोहोचविला.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ नावाची पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यामध्ये राज्यातील मोजक्या ३५ शाळांमधील आगळेवेगळे उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव रंजितसिंह देओल, एमपीएसपीचे संचालक कैलास पगारे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे ९ मार्च रोजी प्रकाशन झाले. त्यानंतर पुस्तिकेची प्रत प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्यात आली.

गुणी शिक्षक, गुणवंत शाळा पुस्तिकेच्या पहिल्याच आवृत्तीत यवतमाळ जिल्ह्यातील बिटरगाव (उमरखेड) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचा समावेश करण्यात आला. या शाळेमध्ये राबविले जाणारे अनोखे उपक्रम एमपीएसपीच्या पसंतीस उतरल्याने पुस्तिकेत ‘आपली प्रेरणादायी शाळा’ अशा शीर्षकाखाली त्यांचा समावेश झाला. बिटरगाव शाळेत विद्यार्थ्यांसाठी अफलातून बचत बँक चालविली जाते. या बँकेत आजघडीला विद्यार्थ्यांनी चक्क सव्वा लाख रुपये जमा केले. या पैशाच्या व्याजातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत पुरविले जाते.

जंगल परिसर असल्याने साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांना वारंवार बाहेरगावी जावे लागू नये म्हणून शाळेतच ग्राहक भांडार सुरू करण्यात आले. तेथेच ना नफा, ना तोटा तत्त्वावर विद्यार्थ्यांना साहित्य मिळते. छोट्या-छोट्या घरांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन रात्रशाळेचा उपक्रम सुरू करण्यात आला. शाळेतील प्रगत विद्यार्थी रात्री संपूर्ण वर्ग एकत्र बसवून शिकवतो. त्यांना शाळेतर्फे खडू, फळा व इतर साहित्य पुरविले जाते. त्यासोबतच सांकेतिक लिपी, माझे हस्ताक्षर, वर्ग नायक होणार, दिनचर्या वेळापत्रक असे विविध उपक्रम उपयुक्त ठरत आहेत.

शाळेची शिस्त टिकवण्याची जबाबदारी...

या शाळेने सुरू केलेले सीआयडी, एसआयटी उपक्रम अत्यंत विशेष ठरले आहेत. शाळेत जे विद्यार्थी गोंधळ घालतात अशा विद्यार्थ्यांना निवडून त्यांची सीआयडी टीम तयार करण्यात आली. या सीआयडी विद्यार्थ्यांवरच शाळेची शिस्त टिकविण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे सीआयडी विद्यार्थ्यांचा शाळेवर वचक बसला. विशेष म्हणजे आधी धटिंगण म्हणून प्रसिद्ध असलेले व नंतर सीआयडी बनविण्यात आलेले हे विद्यार्थी स्वत:ही शिस्त पाळू लागले. त्यासोबतच काही विद्यार्थ्यांची एसआयटी म्हणजे स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली.

या टीममधील विद्यार्थी शाळेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याकडे नजर ठेवतात. आता हे सीआयडी आणि एसआयटी विद्यार्थी राज्यभरातील शाळांमध्ये एमपीएसपीच्या पुस्तिकेद्वारे पोहोचले असून सर्वच शाळांना सीआयडी विद्यार्थ्यांची संकल्पना आवडत आहे. बिटरगावचे मुख्याध्यापक अरविंद जाधव यांच्यासह गोविंद फड, तुळशीराम गायकवाड, नागनाथ हाके, विष्णू दुधे, विनायक वानखेडे, शुभांगी जाधव या शिक्षकांनी ही शाळा वैशिष्ट्यपूर्ण बनविली आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने साधारण सप्टेंबरमध्येच प्रत्येक शाळेकडून उपक्रमांची माहिती मागविली होती. गुणी शिक्षक, गुणवंत शाळा या पुस्तिकेच्या पहिल्याच आवृत्तीमध्ये आमच्या उपक्रमांचा समावेश झाला. याबद्दल समाधान आहे.

- अरविंद जाधव, मुख्याध्यापक, जि. प. शाळा बिटरगाव खुर्द

Web Title: Small CIDs from banned areas became famous across the state; Bittargaon initiative reached everywhere through MPSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.