पुसद जंगलात तस्करांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 09:22 PM2017-09-21T21:22:36+5:302017-09-21T21:22:49+5:30
घनदाट जंगलासाठी आणि मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील जंगलात मराठवाड्यातील तस्करांचा मुक्तसंचार सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : घनदाट जंगलासाठी आणि मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील जंगलात मराठवाड्यातील तस्करांचा मुक्तसंचार सुरू आहे. हिंगोली परिसरातून खंडाळा मार्गे तस्कर जंगलात शिरत असून दिवसाढवळ्या सागवानाची कत्तल करीत आहे. गस्तीच्या नावावर वन अधिकारी आणि कर्मचारी केवळ फेरफटका मारत आहे, तर ठिकठिकाणी असलेले वनउपज तपासणी नाकेही कुचकामी ठरले आहे.
पुसद तालुक्याच्या चारही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात सागवानासह विविध बहुमूल्य वृक्ष आहे. या जंगलातील सागवानावर सध्या मराठवाड्यातील तस्करांचा डोळा आहे. स्थानिकांच्या मदतीने तस्कर जंगलात कटाई करतात. वाहनांद्वारे रात्रीच्यावेळी सागवानाची वाहतूक केली जाते. अनेक तस्करांजवळ स्वयंचलित आरामशीन असून त्याद्वारे अवघ्या काही मिनिटात सागवानाचे मोठे झाडही तोडले जाते. या सागवानाचे तुकडे करून वाहनात भरून त्यावर गौण खनिज अथवा वैरण टाकून मराठवाड्यात नेले जाते. गत काही दिवसांपूर्वी उमरखेड येथे पोलिसांनी एका सागवान तस्कराला पकडले होते. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सागवान जप्त करण्यात आले होते. त्याने आपल्या कबुलीत पुसद जंगलातील सागवान असल्याचे सांगितले होते. चौकशी झाली होती. ना तस्कर मिळाले ना ठोस कारवाई झाली.
एकीकडे शासन वृक्ष लागवडीवर भर देत आहे, तर दुसरीकडे तस्कर खुलेआम सागवानाची तोड करीत आहे. अनेकदा सागवान तोडीच्या नावाखाली वन्यप्राण्यांची शिकारही केली जाते. स्थानिक मंडळी रोजगाराच्या आशेने या तस्करांना साथ देतात. जंगलात कुणीही फेरफटका मारला तर सागवानाची तुटलेली थुटे दिसून येतात. परंतु वन विभागाला सागवान तस्करी दिसत नाही. गत काही वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. परंतु कुणाचेही लक्ष नाही. वृक्षप्रेमी केवळ वृक्षरोपणाच्या नावाखाली प्रसिद्ध मिळवत आहे. परंतु जंगलात होणाºया वृक्षतोडीबद्दल कुणीही बोलायला तयार नाही.
वनउपज तपासणी नाके कुचकामी
जंगलातून होणारी सागवान तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी वनउपज तपासणी नाके उभारले आहेत. या नाक्यांवर कर्मचाºयांची कागदोपत्री नियुक्ती केलेली असते. काही अपवाद वगळता रात्रीच्या वेळी कोणत्याही नाक्यावर कर्मचारी दिसत नाही. याच संधीचा फायदा तस्कर घेत आहे, तर काही ठिकाणी तस्कर आणि वन अधिकारी-कर्मचाºयांचे साटेलोटे असते. यातूनही वाहन बिनबोभाट मराठवाड्यात रवाना केले जाते.