विद्यार्थ्यांच्या दप्तरातून दारू तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:24 PM2019-03-23T22:24:25+5:302019-03-23T22:25:12+5:30
आपला शाळेव्यतिरिक्तचा खर्च भागविण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबातील काही मुले चक्क दारू तस्करीच्या धंद्यात उतरले आहेत. चार दिवसांपूर्वी माजरी चेक नाक्यावर हा प्रकार उजेडात आला. यामुळे आता पालकांना सावधानता बाळगण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : आपला शाळेव्यतिरिक्तचा खर्च भागविण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबातील काही मुले चक्क दारू तस्करीच्या धंद्यात उतरले आहेत. चार दिवसांपूर्वी माजरी चेक नाक्यावर हा प्रकार उजेडात आला. यामुळे आता पालकांना सावधानता बाळगण्याची वेळ आली आहे.
सदर विद्यार्थी महामंडळाच्या बसने वणीवरून वरोराकडे जात असताना, ही बाब समोर आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचे वय आणि शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन त्याला तंबी देऊन सोडून दिले. त्याच्या शाळेच्या दफ्तरात काही रोख रक्कम व दारूच्या सात ते आठ बॉटल आढळून आल्या, अशी माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. यापूर्वी याच ठिकाणी वणीतील एका विद्यार्थ्याला दारूसह पकडण्यात आले होते, हे विशेष.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने वणी परिसरातून छुप्या मार्गाने वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यात दारू पोहचविली जात आहे. मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता वणीवरून सुटलेल्या एका बसची माजरी चेकपोस्टवर तपासणी करण्यात आली. त्यावेळी बसमध्ये एक बेवारस बॅग आढळून आली. तपासणी करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर बॅग कुणाची आहे, अशी विचारणा केली असता कुणीही ती बॅग आपली आहे, असे म्हणायला तयार नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ती बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यात सात ते आठ दारूच्या बॉटल काही रोख रक्कम, पुस्तके, नोटबुक आढळून आले.
नोटबुकावर असलेल्या नावावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाºयांनी संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. मात्र त्याचे वय आणि भवितव्याचा विचार करून सक्त ताकीद देऊन त्याला सोडून देण्यात आले. आणखी कितीजण ही कामे करीत आहेत, अशी विचारणा केली असता, सात ते आठ विद्यार्थी दारू पोहचविण्याचे काम करीत असल्याची माहिती या विद्यार्थ्याने दिल्याचे सांगण्यात येते. यातील काही विद्यार्थी हे वणीतील असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आवर घालण्याचे मोठे आव्हान वणी पोलिसांपुढे ठाकले आहे.
एकीकडे वणी शहरात कोवळी पिढी गांजाच्या आहारी गेली आहे. दररोज सायंकाळी निर्जनस्थळी अल्पवयीनांचे टोळके गांजाचे व्यसन करताना दिसते. अद्याप यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले नाही. तर दुसरीकडे अल्पवयीन विद्यार्थी दारू तस्करीत उतरल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गरजू विद्यार्थी तस्करांच्या मोहजालात
शाळेव्यतिरिक्त आगावू गरजा भागविण्यासाठी पालकांकडून पैसे मिळत नाहीत. नेमकी ही कमजोरी हेरून दारू तस्कर दारू पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. सहज पैसे मिळत असल्याने हे विद्यार्थीदेखील तस्करांच्या मोहजालात अडकत आहेत.