पाण्याने उडविली मागास वस्त्यांची झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 09:55 PM2018-04-02T21:55:34+5:302018-04-02T21:55:34+5:30
मोठ्या अपेक्षेने नगरपालिकेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींमधील मागास वस्त्यांना अजूनही प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यात यंदा आलेल्या पराकोटीच्या पाणीटंचाईने तर त्यांची शब्दश: झोप उडविली आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मोठ्या अपेक्षेने नगरपालिकेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींमधील मागास वस्त्यांना अजूनही प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यात यंदा आलेल्या पराकोटीच्या पाणीटंचाईने तर त्यांची शब्दश: झोप उडविली आहे. एखादवेळी कसेबसे मिळालेले पाणी १५ दिवस पुरविण्याची सर्कस करावी लागत आहे. कपडे धुतलेले पाणी नंतर भांडी धुण्यासाठी वापरायचे, लहान मुलांना खुर्चीवर बसवून अंघोळ घालायची, खाली टप ठेवून अंघोळीचे पाणी गोळा करायचे आणि तेच पाणी इतर कामांसाठी वापरायचे असा पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. ‘रियूझ’चा फंडा नागरिकांनी शोधला, मात्र प्रशासनाने या भागात टँकर वाढविण्याची तसदी काही घेतलेली नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी भरण्यासाठी येथील नागरिकांना रात्री शहराला अक्षरश: प्रदक्षिणाच घालावी लागते. जेमतेम दोन गुंड भरतानाच अर्धी रात्र संपून जाते. मग दुसऱ्या दिवशीच्या कामावरही परिणाम होतो...
आधीच दुर्लक्षित असलेल्या मागास वस्त्यांची भिस्त हातपंप आणि नळावरच आहे. महिनाभरापासून येथे प्राधिकरणाचा नळही आलेला नाही. त्यामुळे नागरिकांचे लोंढे हातपंपावरच जमले आहेत. अर्ध्या हापश्यांनी तळ गाठला आहे. तर काही नादुरुस्त आहेत. दुरूस्तीसाठी नागरिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार पुरवठा केला. तरी उपयोग झाला नाही.
या वस्त्यांमध्ये टँकर घेऊन जाणारा ड्रायव्हर नगरसेवक सोबत असल्याशिवाय पाणीच वाटत नाही. पाणी दिल्यानंतरही अनेकजण टँकर मिळालेच नाही, असा आरोप करतात. यामुळे वितरित पाण्याची ग्राहकांच्या स्वाक्षरीने नोंद घेणे नगरसेवकांनी सुरू केले आहे.
सहा ट्रिपनंतरही गांधीनगर तहानलेलेच
गांधीनगरात प्रत्येक घराला पाणी मिळावे म्हणून टँकरचे नियोजन नगरसेवक गजानन इंगोले यांनी केले. त्याकरिता एक स्वतंत्र रजिस्टर केले. ज्यांना पाणी दिले, त्यांच्या त्यावर स्वाक्षºया घेतल्या जातात. मात्र दिवसाच्या सहा ट्रिप अपुºया आहेत. ज्या ठिकाणापासून पाणी वाटपाला प्रारंभ केला, त्या ठिकाणी पुन्हा येण्यासाठी किमान आठ दिवसाचा वेळ लागतो. तोपर्यंत या भागातील नागरिकांना पाणी जपून वापरावे लागते, असे जीवन भेंडारे म्हणाले. या भागात रोहित चौधरीचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. पाण्याच्या कमतरतेने त्यांचा व्यवसायच प्रभावित झाला आहे. पाणी नसल्याने नागरिक कपडे कमी धूत आहेत. यामुळे कपडे प्रेसला येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
धोबीघाट पडला बंद
तलाव फैलात गोळा होणारे पाणी धोबीघाटात जात होते. या ठिकाणावर कपडे धुतले जात होते. याकरिता या ठिकाणावर प्रचंड गर्दी व्हायची. तलाव फैलातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नाला बांधला जात आहे. यामुळे या भागात पाणीच नाही. यातून धोबीघाटावर धुणे धुणाऱ्या गृहिणी आणि व्यावसायिकही दिसत नाही.
जय बजरंग चौकात नळही कुचकामी
गवळीपुऱ्याकडे जाणाऱ्या जय बजरंग चौकामध्ये एक सार्वजनिक नळ आहे. हा भाग उतारात आहे. यामुळे पूर्वी दररोज पाणी राहत होते. तीन ते चार किलोमीटर अंतरावरून नागरिक पाण्यासाठी येथे येत होते. आता तीन ते चार दिवसापासून नळ बंद आहे. रविवारी या नळाला बारीक धार होती. या भागातील इतर हातपंप कोरडे पडले आहेत. आता पाणी आणायचे तरी कुठून, असा गंभीर प्रश्न कौशल्या रामटेके, सुरेखा जाधव, कविता कोडापे यांनी मांडला.
तलाव असूनही चमेडीयानगर कोरडे
चमेडीयानगर तलाव फैल परिसरात आहे. तरी येथील बोअरवेल आणि हापश्या कोरडया आहे. यामुळे या भागातील नागरिकांची भिस्त टँकरवरच आहे. सात-आठ दिवसानंतर टँकर फिरविला जातो. यामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे. पंचशिल चौकाकडून येथील नागरिक पाणी आणतात. त्यासाठी संपूर्ण दिवस वाया जातो, असे सुनिता भरने, भीमाबाई पावडे म्हणाल्या. अनेकजण भंगीपुऱ्यातून पाणी आणतात, असे त्यांनी सांगितले.
पॉवर हाऊस परिसरात पाण्यासाठी जागरण
या भागात रोजमजुरी करून पाण्यासाठी रात्र जागण्याची वेळ आली आहे. अरूंद रस्त्यांमुळे शेवटपर्यंत टँकर पोहचत नाही. यामुळे पाणी टिकविण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर केला जातो. कपडे धुतलेले पाणी भांड्यासाठी वापरले जाते, असे सुनिल उदापुरे म्हणाले. बहुतांश नागरिक कॉटन मार्केट, वॉटर सप्लाय आणि छोटी गुजरी चौकातून पाणी आणण्याच प्रयत्न करतात. संपूर्ण परिसर रात्री जागा असतो, असे शेख अय्यूब म्हणाले, समीर भानखेडे, इमरान खान, पप्पू ढाले, अजित माकोडे, चेतन कावळे, कांचन भानखेडे म्हणाले. नळाला पर्यायी व्यवस्था म्हणून टँकर आहेत. मात्र, ही व्यवस्था कुचकामी असल्याचे ते म्हणाले.
खासगी टँकरची प्रतीक्षा
मोफत पाण्याचे टँकर मिळविण्यासाठी सात ते आठ दिवस प्रत्येक प्रभागाला प्रतीक्षा करावी लागत आहे. काही लोक अत्यावश्यक बाब म्हणून खासगी टँकरधारकांना फोन करतात. हे टँकरही वेटींगवर आहे. यामुळे खासगी टँकर मिळणेही अवघड झाले आहे.
सार्वजनिक शौचालये मोडकळीस
सार्वजनिक शौचालये बोअरवेलवर आहेत. या बोअरवेलचे पाणी संपले आहे. यामुळे शौचालयातही पाणी नाही. यातून मागास वस्त्यांमधील शौचालयात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. आता नागरिकांनी शौचालयांकडे पाठ फिरवायला सुरूवात केली आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उपाययोजनांची मागणी आहे.