नुसतं भाईयो न् बेहनो मन्ल्यानं पोट भरीन काय?
By admin | Published: January 4, 2017 12:20 AM2017-01-04T00:20:31+5:302017-01-04T00:20:31+5:30
सरकारने नोटाबंदी केली. त्यानंतर कॅशलेस व्यवहारासाठी आग्रह धरला जात आहे. ३१ डिसेंबरला पंतप्रधानांनी विविध घोषणांचा पाऊसही पाडला.
नोटाबंदी, कॅशलेसने गोरगरीब संभ्रमात : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणांवरही यवतमाळातील सामान्यांचे सवाल
अविनाश साबापुरे यवतमाळ
सरकारने नोटाबंदी केली. त्यानंतर कॅशलेस व्यवहारासाठी आग्रह धरला जात आहे. ३१ डिसेंबरला पंतप्रधानांनी विविध घोषणांचा पाऊसही पाडला. त्याबाबत मध्यमवर्गीयांमध्ये आनंदही पसरला आहे. परंतु, रस्त्यावर मजुरी करणाऱ्या माणसांचा आर्त आवाज अद्यापही सरकारी कानांपर्यंत पोहोचलेला नाही. झपाट्याने बदलणाऱ्या अर्थव्यवहारात आपले पोट भरणार की नाही, हाच सवाल त्यांचे काळीज कुरतडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या त्रासातून बाहेर निघण्यासाठी देशवासीयांना ५० दिवसांचा अवधी मागितला होता. तो देशाने दिलाही. त्यानंतर ‘नमो’स्टाईल घोषणा झाल्या. त्या घोषणांचा गरिबांना खरेच फायदा झाला का, होणार आहे का, झाला तर किती प्रमाणात, नाही झाला तर का नाही झाला आदी विषयांवर बुद्धिजीवी बेसुमार चर्चा करीत आहेत. पण प्रत्यक्ष गरीब माणसाला काय वाटते? त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न मंगळवारी ‘लोकमत’ने केला आणि हातावर पोट जगविणाऱ्या माणसांनी अंत:करण खुले केले... त्यांच्याच या प्रातिनिधिक प्रतिक्रिया! भाषा थोडी तडफ आहे. कडक आहे. किंचित गावंढळही वाटेल. पण तळमळ खरी आहे... समजून घ्या!
मोदी बी आश्वासन देते
आमच्यावानी चिल्लर लोकायच्या धंद्यावर नोटाबंदीचा लई फरक पडला. मोदी म्हणे का सबन ठिक होईन. पण झालं का? आता बी चिल्लर भेटून नाई राह्यले. मले लोकायची उधारी फेडाची हाये. पण धंदाच नाई चालून राह्यला तं पैसे द्याचे कोठून? ठप्प झाला माणूस. पह्यलेच्या सरकारवानी मोदी बी आश्वासन देते. अरे, साधी माही सिलेंडरची सबसिडी तं वेळेवर जमा होत नाई भाऊ. बाकी तं दूरच राह्यलं. आता मोदीनं भाषण केलं. पण मले काय वाट्टे, नुसतं भाईयो न् बेहनो मन्ल्यानं आमचं पोट भरीन काय? शेतकऱ्यायचं व्याज सरकार भरणार हाये. पण आमच्यासारख्याचं कोण हाये? आता पेपरमंदी येऊन राह्यलं का बराच पैसा बँकांयमंदी जमा झाला. तं मंग ह्या एवढा पैसा जाणार कुठं हाये?
- संजय श्यामराव मेश्राम, पंक्चर दुरुस्तीवाला, मेडीकल चौक
रोज-रोज बँकेत जाणार हावो का ?
चार-पाच हजाराचा माल घेऊन मी धंदा कराले बसतो. तेच्यात एकांदा गिऱ्हाईक दोन हजाराची नोट देते. तेले चिल्लर द्यासाठी मी ह्या दुकानात, थ्या दुकानात चकरा मारा लागते. मी चिल्लर आणत राहू का धंदा करू? मी चिल्लर पाहात राह्यतो अन् गिऱ्हाईक निंगून जाते. आम्ही रोज कमावून रोज खाणारे माणसं हावो. कॅशलेस व्यवहार करून पैसे काढाले का रोज-रोज बँकेत जाणार हावो का? गिऱ्हाईकाकडून कॅशलेस पद्धतीने पैसे घेणे आमच्यासारख्या लहान-सहान दुकानदारांना पडवडणार तरी आहे का? बरं तेही जाऊद्या, आमच्या दुकानात रोज कोणता ना कोणता भिकारी येतेच, त्याले दोन रुपये द्याचे का त्याच्या अकाउंटमंदी टाकाचे? थे कॅशलेस मोठ्या लोकायसाठी ठिक हाये, आपले थे कामच नोहोय.
- दिगांबर मराठे, फुटपाथवरील विक्रेता, तहसील परिसर, यवतमाळ
पह्यले सरकारी आॅफीसात कॅशलेस करा
सरकार आपल्याले कॅशलेस व्यवहार करा म्हंते. पण पह्यले सरकारी आॅफीसात तं करा म्हणा. आता बी तहसीलमंदी दाखला काढाले जा, बिना पैशाचा देते का तं पाहा. शंभराची नोट काहाडली का रप्पकन काम होते. मी आपला लहानचा धंदा करतो. मी तं गिऱ्हाईकायले पैसेच मागन. मले कॅशलेस कराचं असन तं सरकारनं सबन धंदेवाल्यायले पह्यले फ्रीमंदी (स्वाईप) मशीन देल्ली पाह्यजे. अन् फ्रीमंदी मशीन देल्ली बी तरी मले तेचं फुकटफाकट भाडं भराच लागन दर मह्यन्याले. नसला धंदा होय हे सरकारचा. सध्या तं चिल्लरचाच वांदा दुरुस्त करा म्हणा सरकारले. गिऱ्हाईक आला का मले चिल्लरसाठी हिंडा लागून राह्यलं.
- रोहीत खोब्रागडे, रसवंती चालक, जिल्हा कचेरी परिसर
काही बोलणार नाही
अमराईपुरा परिसरातील हेअरसलूनवाल्याने तर मोदी सरकारविषयी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. पण तो जे काही बोलला, ते सध्यस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे होते. तो म्हणाला...भाऊ, मोदी काय म्हंते, काय नाई म्हनत, मले काई कराचं नाई. आपल्याले काई इचारू नका नं मी काई सांगणार नाई. आता आजकाल आपण बोलतो एक अन् लोकं अर्थ काढते दुसराच. आगाऊ संबंध खराब होते. कोण करे खटखट..!
बायायचा गट थोडी माफ केला ?
काई इचारू नका. मी काय सांगणार हावो बाप्पा? एवढंच समजून घ्या का पह्यले हजाराचा धंदा होये तं आता चारकशे भेट्टे. थे कॅशलेस तं मी पह्यलांदाच आयकलं. आपल्याले थे समजत बी नाई. इथं लोकं च्या पेते नं पैसे देते. नजरेपुढे पैसा पाहाची सवय हाये मले. बँकेतल्या बँकेत पैसे फिरले तं मले काय फायदा होईल? मी तं काई मोदीचं भाषण नाई आयकलं, पण तुम्ही सांगता का सरकार लोकायच्या कर्जाचं व्याज कमी करणार हाये. पण कवा करणार हाये? होतवरी काई खरं असते का ह्या लोकायचं? थे फक्त भाषण देते, करत काई नाई. व्याज माफ केलं तरी काई फरक नाई पडत. गटाच्या बाया एवढ्या फडफडत हाये. पण सरकारनं त्यायचा गट थोडीच माफ केला? लखपती लखपतीच होणार हाये अन् गरीब गरीबच राह्यणार हाये. अजून काय सांगू