रेशन दुकानातून मिळणार साबण अन् शाम्पू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:29 AM2021-11-19T05:29:47+5:302021-11-19T05:30:30+5:30
राज्यातील ५२ हजार दुकानांमध्ये अंमलबजावणी
रूपेश उत्तरवार
यवतमाळ : आतापर्यंत रेशन दुकानातून गहू, तांदूळ, तेल आणि साखर हे जिन्नस मिळायचे. यापुढे स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे. राज्यातील ५२ हजार दुकानदारांना या वस्तूंची विक्री करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. या वस्तू खरेदीसाठी दुकानदाराला थेट कंपनीशी संपर्क साधण्याची आणि नफा मिळविण्याची मुभा दिली आहे.
राज्यभरातील ५१ हजार ५०० दुकानांमधून सात कोटी ग्राहक स्वस्त धान्याची उचल करतात. यात प्रामुख्याने गहू, तांदूळ आणि साखरेचा समावेश आहे. मध्यंतरी डाळ आणि भरड धान्य मिळाले. आता ते बंद करण्यात आले आहे. आता नव्याने चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, डिटर्जंट आणि शाम्पू ठेवण्यास अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या वस्तू दुकानदारांनी स्थानिक पातळीवर स्वत: खरेदी करायच्या आहेत. त्याकरिता थेट
कंपनीशी दुकानदारांनीच बोलायचे आहे. बाजार दरानुसार या वस्तू स्वस्त धान्य दुकानातून विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी अस्थायी स्वरूपात देण्यात आली आहे. यातून मिळणाऱ्या नफ्यावर शासनाचा हस्तक्षेप राहणार नाही. हा नफा थेट विक्रेत्यांना घेण्याची मुभा अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिली आहे.
विक्रेत्यांनी दिला बंदचा इशारा
nरेशन दुकानदारांना मिळणारे कमिशन
परवडणारे नाही. ते दिल्ली आणि
तामिळनाडूप्रमाणे मिळावे, अशी मागणी राज्यातील दुकानदारांची आहे. मात्र, कमिशन वाढवून मिळाले नाही. त्याला पर्याय म्हणून असा आदेश निघाला आहे.
nआमच्याकडून अशा वस्तू ग्राहक घेणार नाहीत, असा आरोप आता विक्रेते करीत आहेत. कमिशन वाढवून द्यावे आणि मोफत धान्य वितरणातील मूळ रक्कम आणि कमिशन अदा करावे, यासाठी १ डिसेंबरपासून रेशन दुकानदार संप करणार आहेत.
या वस्तू स्वस्त दरात मिळणार नाहीत. खासगी दुकानदारांप्रमाणे विकाव्या लागणार आहेत. आमचे यातून उत्पन्न वाढणार नाही. याशिवाय पॉस मशीन फार जुन्या आहेत. त्या फोर जी अथवा फाईव्ह जीच्या द्याव्या. थकलेले कमिशन द्यावे, कमिशनमध्ये वाढ करावी.
- दिगांबर पाटील, राज्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र रास्त भाव दुकानदार महासंघ