यवतमाळात दुर्गोत्सवातून सामाजिक प्रबोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 06:30 PM2018-10-15T18:30:52+5:302018-10-15T18:32:14+5:30
राज्यभरातील भाविक दुर्गोत्सवातील आकर्षक देखावे बघण्यासाठी यवतमाळच्या दिशेने येत आहे.
- रूपेश उत्तरवार
यवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव परिचित आहे. या उत्सवातून विविध मंडळे सामाजिक प्रबोधनाचा संदेश देत आहे.
राज्यभरातील भाविक दुर्गोत्सवातील आकर्षक देखावे बघण्यासाठी यवतमाळच्या दिशेने येत आहे. या भाविकांचे प्रबोधन करण्याचे काम येथील दुर्गोत्सव मंडळांनी सुरू केले आहे. दुर्गोत्सवात देखाव्यांसोबत वैचारिक प्रबोधनावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक मंडळाने त्या दृष्टीने देखावा साकारला आहे. वैद्यनगरातील श्री गुरूदेव दुर्गोत्सव मंडळाचे २८वे वर्ष असून मंडळाने आगळावेगळा देखावा साकारला. मंडळाने सीमेवर लढणा-या सैनिकांना हा उत्सव समर्पित केला. प्रवेशद्वारावरच अमर शहीद समर्पण, असा उल्लेख असलेले चित्र लावले. मंडळात मातेच्या मंदिराआत मंदिर, गुरुद्वारा, चर्च असे सर्वधर्मांचे प्रतीक असलेले चित्र आणि चिन्ह अंकित केले. यातून सर्वधर्म व समतेचा संदेश देण्यात आला.
समर्थवाडीमधील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळाने रेन वॉटर हार्व्हेस्टिंगवर भर दिला. रोलमॉडेलच मंदिराच्या आत ठेवण्यात आले. पडणारा पाऊस आणि छतावरील पाणी भूगर्भात जमा होतानाचे चित्र दाखविण्यात आले. घनदाट जंगलात वृक्षाखाली माँ दुर्गेची मूर्ती बसविली. विविध पक्षी आणि वन्यप्राण्यांचे वास्तव्य दर्शविले. यामुळे या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक जंगलात आल्याचा अनुभव घेतो. सोबतच मुलगी वाचवा आणि बळीराजाचे राज्य येऊ द्या, असे विचार मांडण्यात आले.
लोकमान्य दुर्गोत्सव मंडळाने माँ दुर्गेचे सगुण आणि निर्गुण रूप रेखाटले. गांधी चौकातील गांधी चौक दुर्गोत्सव मंडळाने मुलगी वाचविण्याचा संदेश दिला. स्टेट बँक चौकातील समर्थ दुर्गोत्सव मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून मंडळाने केदारनाथचा देखावा साकारला. वृक्ष लागवडीवर भर देणारा संदेश दिला. जय हिंद दुर्गोत्सव मंडळाचे ५६ वे वर्ष असून मंडळाने मयूर पॅलेस साकारला आहे. अभयारण्यातील राष्ट्रीय पक्षांवर संपूर्ण देखावा केंद्रीत केला आहे. दहिवलकर ले-आउटमधील जय विजय दुर्गोत्सव मंडळाने वृक्षांना केंद्रस्थानी मानून माँ दुर्गेची स्थापना केली. येथे दर्शनाकरिता येणाºया प्रत्येक भक्तांना वृक्ष संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात येते. आर्णी नाक्यावरील एकता दुर्गोत्सव मंडळाने महाराष्ट्रीयन संस्कृती रेखाटली आहे.
विजेची बचत करणारा आयफेल टॉवर
फ्रान्समध्ये एक हजार ५३ फुटांचे जगातील सर्वात उंच आयफेल टॉवर आाहे. येथील राणी झाँशी चौकातील बंगाली दुर्गोत्सव मंडळाने विजेची बचत करण्याचा संदेश देत ५५ फुटांचा प्रतिकात्मक आयफेल टॉवर उभारला आहे. सोबतच श्रीकृष्णकालीन व्यक्तिरेखा साकारल्या.