लग्नसोहळ्यातून सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:32 PM2018-05-08T22:32:24+5:302018-05-08T22:32:24+5:30

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. कौटुंबिक आनंदाला उधाण. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाड्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

 Social commitment through wedding | लग्नसोहळ्यातून सामाजिक बांधिलकी

लग्नसोहळ्यातून सामाजिक बांधिलकी

Next
ठळक मुद्देलेक वाचवा, लेक शिकवा : श्रमदान करून नववधूचा गृहप्रवेश

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. कौटुंबिक आनंदाला उधाण. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाड्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
दारव्हा येथील जीवन काळे हा युवक ओम युवा मंच व युवक टिमचा सक्रिय कार्यकर्ता असून विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतो. सामाजिक जाणीवेतून काही तरी वेगळं करण्याचा ध्यास होता. ३० एप्रिल रोजी जीवन व राणी विवाह बंधनात अडकले. विवाह संस्मरणीय ठरला. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संदेश देणारे फलक लक्ष वेधून घेत होते.
लग्न सभागृहात स्वच्छ भारत मिशनचा फलक व्हराड्यांना कर्तव्याची जाणीव करून देत होता. लेक वाचावा-लेक शिकवाचा सचित्र संदेश मुलींविषयी आत्मसन्मान जागविणारा ठरला. एवढेच नव्हे, तर पारंपारिक मंगलाष्टके आटोपताच नवदांपत्यासह वऱ्हाडी मंडळीने ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ची शपथ घेतली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंचच्या अर्चना उडाखे यांनी सदर शपथ वदवून घेतली.
भोजनस्थळी अन्नाची नासाडी टाळण्याबाबतचा संदेश अंतर्मुख करायला लावणारा होता. भोजनावर मनसोक्त ताव मारल्यानंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाणी फाऊंडेशनच्या श्रमदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करीत पाण्याचे महत्व पटवून दिले. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनम्र अभिवादन करण्यात आले. सोबतच पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे नवरीला निरोप दिल्यानंतर गृहप्रवेशापूर्वी भुलाई येथे जावून पानी फाऊंडेशनच्या उपक्रमात जीवन व राणीने श्रमदान केले. जलचळवळीत सहभागी होवून वेगळा आदर्श निर्माण केला. यावेळी ओम युवा मंच, युवा टीम, सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
नववधू-वरासह वऱ्हाड्यांनी घेतली शपथ
लेक वाचवा-लेक शिकवासाठी मी वचन बद्ध आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यास..., मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यास ..., मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मानसिकता बदलण्यास..., मुले व मुली समानता करण्यासाठी..., बालविवाह व हुंडा पद्धतीचा विरोध करण्यास..., महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यास..., प्रसूतीपूर्व गर्भनिदान तपासणीचा विरोध करण्यास ..., स्त्रीभ्रूण हत्येला विरोध करण्यास..., मुलींचे संरक्षण करण्यास...., मी वचनबद्ध आहे.

Web Title:  Social commitment through wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न