७५ वर्षीय आजोबांची ‘नेल आर्ट’द्वारे समाजसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:50 PM2018-05-15T23:50:50+5:302018-05-15T23:50:50+5:30
रस्त्यावर पहुडलेला गरीब माणूस दोन वेळच्या जेवणासाठी मोताद आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध कलावंत उभा राहतो. एक चिटोरा घेतो. चिटोऱ्यावर नखं पटापटा खुपसून खुपसून तीन-चार सेकंदात नेटकं चित्र तयार करतो.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रस्त्यावर पहुडलेला गरीब माणूस दोन वेळच्या जेवणासाठी मोताद आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध कलावंत उभा राहतो. एक चिटोरा घेतो. चिटोऱ्यावर नखं पटापटा खुपसून खुपसून तीन-चार सेकंदात नेटकं चित्र तयार करतो. लोकं दहा-वीस रुपयांचे बक्षीस देतात. ते सारे पैसे कलावंत त्याला जेवणासाठी देतो अन् निमूट निघून जातो... हा सिनेमा नव्हे, विजय चव्हाते नावाच्या मुग्ध चित्रकाराची समाजसेवा आहे.
पुण्याचे विजय चव्हाते सध्या यवतमाळात मुक्कामी आहेत. त्यांची सून यवतमाळची आहे. व्याही उल्हास लचके यांच्याकडे ते थांबले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांचा आस्वाद घेणाºया बच्चे कंपनीमध्ये सध्या विजय चव्हाते एक वेगळीच कला ‘फेमस’ करीत आहे. नेल आर्ट. म्हणजे, साधा कागद घेऊन त्यावर नखांचा दाब देत एखादे चित्र तयार करणे. चित्रही इतके सुबक आणि हुबेहुब की, कुणाला वाटावे शिक्काच मारलेला असावा.
जे जे स्कूल आॅफ आर्ट गाजविणारे विजय चव्हाते, यांनी कलेच्या जोरावर समाधानकारक पैसा मिळविला. एम.एफ. हुसेन, बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब ठाकरे सारख्या कलावंतांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. आता वयाच्या पंच्याहत्तरीत त्यांनी चित्रकारितेसोबतच ‘नेल आर्ट’ ही वेगळीच कला जोपासली. त्याआधारे ते गरिबांना छोटी मोठी का होईना मदत मिळवून देत आहेत.
ते शाळेतील विद्यार्थ्यांना ही ‘नखचित्रे’ शिकविण्यासाठी हौसेने जातात. असेच एकदा एक गरीब विद्यार्थिनी सायकलसाठी तळमळताना त्यांना दिसली. विजय चव्हाते यांनी लगेच लोकांना नखचित्रे काढून दाखविली. लोकांनी पैसे दिले अन् ते पैसे घेऊन चव्हाते यांनी लगेच त्या विद्यार्थिनीला सायकल मिळवून दिली. पैसा मी खूप कमावला, पण आपल्या कलेमुळे इतरांना समाधान मिळवून द्यावे, हाच माझा उद्देश असतो, असे विजय चव्हाते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
मंगळवारी यवतमाळात त्यांनी सर्वांपुढे अवघ्या काही मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री आदींची नखचित्रे काढून दाखविली. तेव्हा प्रत्येकाने त्यांच्या कलेला दाद दिली. उन्हाळी सुटीत मुलांनी ही कला शिकून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.