शिवछत्रपती महोत्सवात सामाजिक प्रबोधनाची जत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:29 AM2018-02-13T00:29:57+5:302018-02-13T00:30:26+5:30
कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यवतमाळात छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यवतमाळात छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १६ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाºया या महोत्सवात जिल्हावासीयांना सामाजिक प्रबोधनाची जत्रा अनुभवता येणार आहे.
सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. या महोत्सवात १६ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयात होणार आहे. सायंकाळी ६ वाजता छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे तसेच माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून मोहम्मद तारीक मो. समी लोखंडवाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी छत्रपती संभाजी राजे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यंदाचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे यांना देण्यात येईल, असे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. सायंकाळी तीन तास क्रांतीगीतांचा ‘क्रांती जलसा’ हा कार्यक्रम होणार आहे. शितल साठे व सचिन माळी यात सादरीकरण करणार आहेत.
शनिवारी १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता वेशभूषा स्पर्धा होईल. त्यानंतर प्रसिद्ध वक्ते व इतिहास तज्ज्ञ प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज दी ग्रेट मॅनेजमेंट गुरू’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. याच कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता बुद्धीबळ स्पर्धा, १० वाजता शिवरत्न संगीत सम्राट राज्यस्तरीय गायन स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता समूहनृत्य स्पर्धा, सात वाजता जिल्हास्तरीय शिवनाट्य पोवाडे स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री संजय देशमुख राहतील. याचवेळी छत्रपती राजश्री शाहू महाराज सामाजिक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
१९ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पालकमंत्री मदन येरावार व स्वागताध्यक्ष मोहम्मद तारीक मो. समी लोखंडवाला यांच्या हस्ते माल्यार्पण केले जाणार आहे. जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना व जिल्हा अम्युचर अँड अॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने सकाळी ७ ते ९ पर्यंत ‘रन फॉर शिवाजी’ ही शिव मॅराथॉन स्पर्धा घेतली जाईल. समता मैदानावर होणाºया बक्षीस वितरण समारंभात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय शिबिर, वंचितांना कपडे वाटप, रुग्णांना फळवाटप, तर २३ फेब्रुवारीला संत गाडगेबाबा जयंती साजरी करून महोत्सवाचा समारोप होणार आहे. पत्रपरिषदेला मुख्य संयोजक डॉ. दिलीप महाले, सुदर्शन बेले, प्रवीण देशमुख, राजेंद्र धोंगडे, प्रकल्प अधिकारी सुनिल कडू, प्रवीण भोयर, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, प्रा. डॉ. संगीता घुईखेडकर, अर्चनाताई देशमुख, संगीताताई होनाडे, अंकुश वाकडे, सृष्टी दिवटे, नितीन पखाले, विशाल चुटे आदी उपस्थित होते.
विद्यार्थी हाच महोत्सवाचा केंद्रबिंदू
छत्रपती महोत्सवातून आजच्या विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. शालेय व महाविद्यालयीन पिढीला केंद्रबिंदू मानूनच कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. ‘शिवरायांच्या स्वप्नातील आजचे मावळे’ अशा विषयावर शिवचित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली आहे. भव्य शोभायात्रा म्हणण्याऐवजी यंदा ‘आदर्श शोभायात्रा’ असे संबोधण्यात आले आहे. शिवाय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन किल्ले बनवा स्पर्धाही होणार आहे. शिवसामान्यज्ञान परीक्षेतून हजारो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.