बालवैज्ञानिकांचे समाजोपयोगी आविष्कार
By Admin | Published: January 24, 2016 02:15 AM2016-01-24T02:15:29+5:302016-01-24T02:15:29+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनुभवयाचा असेल तर पुसद येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यावी लागेल.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन : सौर कंदील संचालित धान्य स्वच्छता यंत्र आकर्षणाचे केंद्र
पुसद : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनुभवयाचा असेल तर पुसद येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यावी लागेल. ग्रामीण आणि आदिवासी भागातील बाल वैज्ञानिकांनी या प्रदर्शनात समाजोपयोगी अविष्कार सादर केले आहेत. आदिवासीबहुल झरी तालुक्यातील मार्कीच्या विद्यार्थ्यांचे ‘सौरकंदील संचालित धान्य स्वच्छता यंत्र’ सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्य विज्ञान संस्था व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या प्रदर्शनात १०५ प्रतिकृती सादर करण्यात आल्या आहे. त्यामध्ये प्राथमिक गटात ३२, माध्यमिक गटात ४३, प्राथमिक शिक्षक गटात १५, माध्यमिक शिक्षक गटात १० तर प्रयोगशाळा परिचय गटातील चार प्रतिकृतींचा समावेश आहे. बाल वैज्ञानिक या विज्ञान प्रदर्शनात आपला प्रयोग समजावून सांगत तो सामाजासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो हे पटवून देत आहेत.
झरी तालुक्यातील मार्की बु. येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी अविनाश मडावी व सपना आत्राम यांनी ग्रामीण भागासाठी उपयुक्त असे संयत्र शोधले आहे. त्यांनी सौर कंदिलाव्दारे धान्य स्वच्छता यंत्र याठिकाणी साकारले आहे. शेतकऱ्यांना धान्य विक्रीस नेताना अस्वच्छ धान्यामुळे कमी भाव मिळतो. घरूनच धान्य स्वच्छ करून नेले तर त्याला अधिक भाव मिळू शकतो. यासाठी या विद्यार्थ्यांचा हा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधत आहे. घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा जगदंबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातील सांडपाण्यापासून विद्युत निर्मिती व त्याचे शुद्धिकर व त्याची प्रतिकृती सादर केली आहे.
त्याच तालुक्यातील राळेगावच्या स्कूल आॅफ ब्रिलियंडच्या विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन, पुसद तालुक्यातील आसोलीच्या विद्यार्थ्यांनी पार्किंग झुला, आर्णीच्या म.द.भरती विद्यालयाचे डास निर्मूलन सयंत्र, गुणवंतराव देशमुख विद्यालयाचा मक्याच्या टाकाऊ कणसापासून पाणी शुद्धिकरण, नेर येथील न्यु इंग्लिश हायस्कूलचा आपातकालिन अडथळ््यापासून वाचविणारी कार आदी प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधत आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्राचार्य डॉ. हमेश नानवाला आदींच्या पुढाकारातून प्रदर्शन सुरू आहे. (प्रतिनिधी)
प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या
पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेले विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत आहे. तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी शिस्तबद्द पद्धतीने या प्रदर्शनाला भेट देऊन प्रतिकृतींची पाहणी करीत आहे. त्यासोबतच अनेक पालकही या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होत आहेत. बाल वैज्ञानिक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.