निळोणाचे फ्लोटिंगपंप व गोखीच्या पाण्यावर मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:18 PM2018-03-27T23:18:14+5:302018-03-27T23:18:14+5:30
अर्ध्याअधिक शहराला ‘जीवन’ देणारा चापडोह प्रकल्प साथ सोडण्याच्या स्थितीत आला आहे. या प्रकल्पातून अखेरची खेप सोडली जात आहे.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : अर्ध्याअधिक शहराला ‘जीवन’ देणारा चापडोह प्रकल्प साथ सोडण्याच्या स्थितीत आला आहे. या प्रकल्पातून अखेरची खेप सोडली जात आहे. आता निळोणा प्रकल्पात लावले जात असलेले फ्लोटींग आणि गोखी प्रकल्पावर शहराला पाणीपुरवठ्याची मदार आहे. नगरपरिषदेच्या टँकरने दिवसही भागत नाही. टँकर वाढवून शहराची तहान भागविण्याची नगरपरिषदेची जबाबदारी वाढली आहे.
चापडोह प्रकल्पातून पाणी ओढण्याचे सर्व मार्ग संपले आहे. चर खोदून, फ्लोटींग (तरंगते पंप) पंप लावून महिना-दीड महिना भागवता आला. या प्रकल्पात आता पाण्याचे डबके तेवढे दिसतात. त्यातून पाणी ओढण्याचा प्रयोगही अघोरी ठरणारा आहे. दर्डानगर, सुयोगनगर, लोहारा, वैभवनगर, वाघापूर नाका, पिंपळगाव येथील टाक्यांमध्ये या प्रकल्पाचे पाणी घेतले जाते. तेथून ज्या भागाला पाणी सोडले जाते, त्या भागाचाही भार आता नवीन उपाययोजनांवर येणार आहे.
निळोणा प्रकल्पाचे भिंतीजवळ असलेले पाणी फ्लोटींग पंपाद्वारे पाणी साठवणुकीच्या विहिरीजवळ आणले जात आहे. सहा पंप या ठिकाणी लावले जात आहे. फ्लोटींगसाठी २४ तास वीज मिळावी याकरिता नवीन खांब टाकून तारा ओढण्यात आल्या आहे. तातडीच्या उपययोजनेअंतर्गत ही कामे करण्यात आली. त्यामुळे निळोणाचे पाणी आता चापडोहच्या टाक्यांमध्ये घेतले जाणार आहे. केवळ निळोणाच्या भरवशावर यवतमाळकरांची पाण्याची गरज पूर्ण करणे कठीण आहे. पाणी साठवून ओढण्यासाठी लागणारा कालावधी आणि शुध्दीकरणासाठी विलंब होणार असल्याने पाणीपुरवठ्यात आणखी गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निळोणाच्या सोबतीला गोखी प्रकल्पाचे पाणी घेतले जाणार आहे. ४० लाख रुपयांची ही आकस्मिक उपाययोजना आहे. या योजनेचे पाणी दर्डानगर टाकीमध्ये घेतले जाणार आहे. येत्या आठ दिवसात हे काम मार्गी लागणार असल्याचे सांगितले जाते. या कामासाठी लागणारे काही आवश्यक साहित्य अमरावती जिल्ह्यातील एका योजनेचे आणण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे. गोखीचे पाणी शक्य तितक्या लवकर मिळाल्यास निळोणावरचा भार कमी होणार आहे. निळोणातील पाणी आताच्या पाणी वितरणानुसार महिनाभर पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘शिवजल’चे २८ टँकर लागणार
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती योजने अंतर्गत आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या सहकार्याने यवतमाळात २८ टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे टँकर सुरू केला जाईल. यावर शिवसैनिकांचे नियंत्रण राहणार आहे. यासाठी गोखी प्रकल्पाच्या प्लांटवरून पाणी घेतले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संजय ढवळे यांनी दिली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष कांचन चौधरी यांचे सहकार्य मिळत असल्याचे संतोष ढवळे यांनी सांगितले.
जलशुद्धीकरणाला लागणार वेळ
निळोणाचे पाणी जंतुमुक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी प्रवाहित करूनच विहिरीत (जॅकवेल) सोडले जाणार आहे. टप्पा पध्दतीने पाणी पुढे सरकविले जाईल. त्यामुळे जंतू नाहिसे होऊन पाणी गाळमुक्त होईल. या पद्धतीने घेतलेले पाणी शद्धीकरणासाठी पाठविले जाईल. ही सर्व प्रक्रिया करताना शुद्धीकरणास विलंब होणार असल्याने, वितरण लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.