समाधान दिनात जागीच सातबारा
By admin | Published: September 21, 2015 02:22 AM2015-09-21T02:22:23+5:302015-09-21T02:22:23+5:30
शासनातर्फे वाढोणाबाजार मंडळस्तरावर घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान दिनात ४६ फेरफार घेण्यात आले.
महाराजस्व अभियान : वाढोणाबाजार येथे विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण
राळेगाव : शासनातर्फे वाढोणाबाजार मंडळस्तरावर घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान दिनात ४६ फेरफार घेण्यात आले. कमी-जास्त फरकाचे २४ फेरफार घेण्यात आले असून ३३ शेतकऱ्यांना जागेवरच सातबारा देण्यात आला. ४७ अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका कृषी अधिकारी एन.आर. कुंभरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंडळातील नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देऊन लाभ दिला.
सुरुवातीला दहा शेतकऱ्यांना ज्वारी आणि चारा पिकाच्या बियाण्यांचे वाटप आमदारांच्या हस्ते करण्यात आले. पुरवठा विभागाने ४२ नागरिकांना रेशन कार्ड तत्काळ सुपुर्द केले. संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत योजनेचे माहिती पत्रक आणि फॉर्मचे वाटप करण्यात आले. आधार कार्ड कॅम्पमध्ये १४ जणांची नोंदणी करण्यात आली. ३४ जणांना फॉर्मचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीने विविध योजनांची माहिती पत्रके स्टॉलमध्ये लाऊन ग्रामस्थांना माहिती दिली. पशुवैद्यकीय विभागाने ९७ जनावरांची तपासणी करून लसीकरण कार्यक्रम राबविला. कृषी विभागाने कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून दिली. (तालुका प्रतिनिधी)