समस्या सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:00 AM2021-02-12T05:00:00+5:302021-02-12T05:00:27+5:30
प्रभाग क्र. १४ सोबत पालिका प्रशासन दुजाभाव करीत आहे. सर्वाधिक कर भरुनही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नाही. पदाधिकाऱ्यांना पाण्यासाठी भेटल्यानंतर तुम्ही मतदान केले नाही, असे सांगितले जाते. या प्रभागावर पदाधिकारी व प्रशासनाचा प्रचंड रोष दिसून येतो. त्यामुळे नागरिक संतापले आहे. गुरुवारी भेटीसाठी येणार असल्याचे लिखीत स्वरूपात देऊनही नगराध्यक्ष व उपाध्यक्ष गैरहजर राहिले. या दोघांचा आपण निषेध करतो, असे ॲड. नीलय नाईक यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहराला विविध समस्यांचा वेढा पडला आहे. प्रभाग क्र. १४ सोबत पालिका प्रशासन दुजाभाव करीत आहे. या परिसरातील नागरिक सर्वाधिक कर भरुनही त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यामुळे संतापलेल्या प्रभागातील नागरिकांनी गुरुवारी आमदार ॲड. नीलय नाईक यांच्या नेतृत्वात पालिकेवर धडक दिली. त्यांनी समस्या सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा दिला.
प्रभाग क्र. १४ सोबत पालिका प्रशासन दुजाभाव करीत आहे. सर्वाधिक कर भरुनही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नाही. पदाधिकाऱ्यांना पाण्यासाठी भेटल्यानंतर तुम्ही मतदान केले नाही, असे सांगितले जाते. या प्रभागावर पदाधिकारी व प्रशासनाचा प्रचंड रोष दिसून येतो. त्यामुळे नागरिक संतापले आहे. गुरुवारी भेटीसाठी येणार असल्याचे लिखीत स्वरूपात देऊनही नगराध्यक्ष व उपाध्यक्ष गैरहजर राहिले. या दोघांचा आपण निषेध करतो, असे ॲड. नीलय नाईक यांनी सांगितले. ज्या पालिकेची धुरा दिवंगत वसंतराव नाईक यांनी सांभाळली, त्या पालिकेची दुर्दशा पाहून दु:ख होते. किमान मुख्याधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन सोडविले पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार ॲड. नाईक यांनी दिला.
गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आमदार ॲड. नाईक यांच्या नेतृत्वात भाजप नगरसेवक व नागरिक पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पालिकेत धडकले. मात्र पदाधिकारी गैरहजर होते. मुख्याधिकारी डाॅ. किरण सुकलवाड त्यांना सामोरे गेले. यावेळी नगरसेवक व नागरिकांनी प्रभागातील समस्यांचा पाढा वाचला. गेल्या चार वर्षात किती कामे केली असा प्रश्न उपस्थित केला. सीओंनी साडेतीन कोटींची कामे झाल्याचे सांगताच नागरिकांनी त्यांना यादी मागितली. संतप्त नागरिकांनी पदाधिकाऱ्यांना बोलविण्याची मागणी केली. सीओंनी सर्व समस्यांची दखल घ्यावी अन्यथा आमच्या पद्धतीने बघू असा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी विरोधी गटनेते निखील चिद्दरवार, डाॅ. आरती फुपाटे, दीपाली जाधव, रुपाली जयस्वाल, अनिता चव्हाण, नीळकंठ पाटील, धनंजय अत्रे, भारत पाटील, महेश नाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. समस्या न सुटल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
मोर्चानंतर घेतली पत्रपरिषद, समस्यांचा वाचला पाढा
पालिकेवर धडक दिल्यानंतर भाजपने पत्रपरिषद घेतली. त्यात विविध आरोप केले. प्रभाग क्र. १४ सह शहरातील विविध समस्यांचा यावेळी पाढा वाचण्यात आला. आमदार ॲड. नीलय नाईक यांनी नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला. रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज पुरवठा आदी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. समस्यांबाबत मुख्याधिकारी डाॅ. किरण सुकलवाड यांना निवेदन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला ॲड. नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी डाॅ. किरण सुकलवाड यांनी हा प्रभाग इतर प्रभागाच्या तुलनेत मोठा असल्याचे सांगितले. नागरी सुविधांबाबत नगराध्यक्ष व सदस्यांच्या कानावर घालून प्रशासकीय मान्यता मिळताच प्रभागातील कामे हाती घेण्यात येतील, असेही स्पष्ट केले. दरम्यान, नगराध्यक्ष प्रकृती अस्वाथ्यामुळे मोर्चाला सामोरे जावू शकल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.