अन् जावयाने सासऱ्याला पत्नीसमोरच मारहाण करीत केले ठार; यवतमाळमधील थरारक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 04:43 PM2022-07-01T16:43:18+5:302022-07-01T16:52:37+5:30
ही खुनाची घटना उघड झाली तर पोलीस तुझ्या पतीला अटक करतील, पुढे तुझे काय होईल, अशा स्वरूपाचा दबाव अनिता आडे हिच्यावर टाकण्यात आला.
यवतमाळ : सालगडी म्हणून शेतावर राहणाऱ्या युवकाने स्वत:च्या सासऱ्याचाच काठीने बेदम मारहाण करून खून केला. पत्नीसमोरच तिच्या वडिलांना ठार करून नंतर ही घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता थरारक घटना घडली. बुधवारी सासऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. याची गोपनीय माहिती घाटंजी पोलिसांना मिळाली. त्यांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.
दत्ता बापूराव मरापे (६५), रा. चिखलवर्धा, ता. घाटंजी असे मृताचे नाव आहे. दत्ता मरापे हे जावई रवींद्र रामदास आडे (२८), रा. पाटापांगरा यांच्यासोबतच पांढुर्णा रोडवरील शेतात राहत होते. रवींद्रची पत्नी अनिता व तिचे वडील दत्ता मरापे हे मंगळवारी सायंकाळी चर्चा करीत बसले होते. त्यावेळी रवींद्र आडे हा आला व त्याने पत्नीला मारहाण सुरू केली. जावई मुलीला मारतोय हे पाहून दत्ता मरापे धावून आले. चवताळलेल्या रवींद्रने सासऱ्यावरच काठीने प्रहार करणे सुरू केले. यात दत्ता मरापे यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, ही खुनाची घटना उघड झाली तर पोलीस तुझ्या पतीला अटक करतील, पुढे तुझे काय होईल, अशा स्वरूपाचा दबाव अनिता आडे हिच्यावर टाकण्यात आला.
ती सर्वांपुढे चूप हेाती. मात्र, पतीने केलेल्या कृत्याचा तिला प्रचंड संताप आला होता. पोलिसांत जाण्यापूर्वीच दत्ता मरापे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. चिखलवर्धा येथे त्यांचा मृतदेह पाठविण्यात आला. मात्र, घाटंजी ठाणेदार मनीष दिवटे यांना गुन्ह्याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथक चिखलवर्धा येथे पाठविले. तेथून मृतदेह घाटंजीत आणण्यात आला. वैद्यकीय तपासणीमध्ये दत्ता मरापे यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे उघड झाले.
अनिता रवींद्र आडे हिनेही पोलिसांपुढे आपबीती कथन केली. चुगल्या करतो या कारणावरून पती रवींद्रने बेदम मारहाण केली, यातच वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार अनिताने दिली. त्यावरून पोलिसांनी रवींद्र आडे याला अटक केली. त्याच्यावर कलम ३०२, ३२३, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार मनीष दिवटे यांनी केला. आरोपीकडून रक्ताने माखलेले कपडे, गुन्ह्यातील काठी जप्त केली. न्यायालयाने रवींद्र आडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अंत्यसंस्काराची तयारी अन् पोहोचले पोलीस
सासऱ्याचा खून केल्यानंतर आरोपी रवींद्र आडे याने पत्नीवर दबाव टाकला. भईतीपोटी ती काहीच बोलली नाही. याचा फायदा घेत सासऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान, चिखलवर्धा येथे पोलीस पोहोचल्याने बिंग फुटले.