मुलाची साक्ष, बापाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:07 PM2018-01-30T23:07:41+5:302018-01-30T23:08:46+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पतीने जाळल्याचा गुन्हा येथील सत्र न्यायालयात मंगळवारी सिद्ध झाला. चार वर्षीय मुलाच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पतीने जाळल्याचा गुन्हा येथील सत्र न्यायालयात मंगळवारी सिद्ध झाला. चार वर्षीय मुलाच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
अंकुश धर्मा चव्हाण असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुसद तालुक्याच्या पिंपळगाव इजारा येथील रहिवासी आहे. पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन १२ डिसेंबर २०१४ रोजी तिचा खून करून मृतदेह जाळल्याचा आरोप अंकुशवर होता. लक्ष्मीबाईच्या खुनाचा खटला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. गावडे यांच्या न्यायालयात चालला. न्यायालयाने या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासले. त्यात मृतक व आरोपी यांचा चार वर्षाचा मुलगा तसेच इतरांची साक्ष महत्वाची ठरली. या घटनेत कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी अंकुश चव्हाण याला भादंवि कलम ३०२ मध्ये जन्मठेप व हजार रुपये दंड तसेच पुरावा नष्ट केल्याच्या कलम २०१ मध्ये एक वर्षाची शिक्षा व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा मंगळवारी न्या. गावडे यांनी सुनावली. या प्रकरणात शासनातर्फे अॅड. महेश निर्मल यांनी बाजू मांडली.
प्रकरण असे की, अंकुश हा कुटुंबासह पिंपळगाव येथे राहत होता. चारित्र्यावर संशय घेऊन तो पत्नी लक्ष्मीबाईचा छळ करीत होता. याच कौटुंबिक वादातून १२ डिसेंबर २०१४ रोजी गावात पंच व नातेवाईकांची समेटासाठी बैठक झाली. पंचांनी दोघांचीही समजूत काढली. त्यानंतर पत्नीला चांगले वागविण्याचे आश्वासन अंकुशने दिले. त्यानंतर ते दोघेही घरी निघून गेले. याच समेटाचा राग अंकुशच्या मनात होता. रात्री घरी कुणीही नसल्याची संधी पाहून अंकुशने लक्ष्मी हिचा गळा आवळून खून केला. लक्ष्मी ही जळाल्याने मरण पावल्याचे चित्र उभे करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह पेटवून दिला व तो घरातून पळून गेला. तो पळून जात असताना बाहेर उभा असलेल्या त्याच्या चार वर्षीय मुलाने त्याला पाहिले.
मुलाने घटनेची माहिती लक्ष्मीचे काका व आजोबाला दिली. त्यावरून अंकुशविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात लक्ष्मीच्या काकाच्या फिर्यादीवरून भादंवि ३०२, २०१, ४९८ अ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. तत्कालीन ठाणेदार व्ही.के. वडतकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला.
घटनेच्यावेळी आपण हजर नव्हतो, नातेवाईकाकडे मुक्कामी होतो, असा बचाव आरोपी अंकुशने न्यायालयात घेतला. एवढेच नव्हे तर त्या नातेवाईकांना साक्षीसाठी न्यायालयात हजरही केले. या खटल्यात न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून पंडित पुंडे यांनी काम पाहिले.