महागावात ३० हजार हेक्टर पेरणी उलटली
By admin | Published: July 23, 2014 12:14 AM2014-07-23T00:14:15+5:302014-07-23T00:14:15+5:30
लांबलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील ३० हजार हेक्टरवरील पेरणी उलटली असून बी-बियाणे आणि खतांचा शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच उशिरा झालेल्या पेरणीने २० टक्के
रितेश पुरोहित - महागाव
लांबलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील ३० हजार हेक्टरवरील पेरणी उलटली असून बी-बियाणे आणि खतांचा शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच उशिरा झालेल्या पेरणीने २० टक्के उत्पादनाही घट येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लागवड क्षेत्राच्या निम्म्या क्षेत्रात शेतकऱ्यांंंना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
महागाव तालुक्यात ८० हजार हेक्टर लागवड लायक क्षेत्र असून ३० हजार शेतकरी आहे. गेल्या कित्येक वर्षात यंदा प्रथमच एक महिन्यानंतर पेरण्या उशिराने कराव्या लागल्या. साधारणत: १५ ते २५ जूनदरम्यान तालुक्यातील पेरण्या आटोपतात. मात्र उशिरा आलेल्या पावसाने १७ जुलै ते २२ जुलैदरम्यान पेरण्या करण्यात आल्या. त्यात कापूस ३१ हजार १७८ हेक्टर, सोयाबीन १९ हजार १५० हेक्टर, तूर ४ हजार १० हेक्टर, उडीद ६३० हेक्टर, मूग ६०७ हेक्टर, ज्वारी ३ हजार ४६० हेक्टर, हळद ३१८ हेक्टर, ऊस ६५० हेक्टर आणि भाजीपाला २३० हेक्टर लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी ६० हजार ५८७ हेक्टरवर पेरणी केली. मात्र पेरणीनंतर पुरेसा पाऊस झाला नाही. वाढत्या तापमानाने बियाणे सुकले. अंकुरलेल्या बियाण्यांंना मोड आली. साधारणत: ३० हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दीड ते दोन कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. तसेच उशिरा पेरणीमुळे उत्पादनात २० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
महागाव तालुक्यात आतापर्यंत केवळ १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तुषार सिंचन सारखा पाऊस कोसळत आहे. नदी, नाले कोरडे असून सिंचन तलावातही पाण्याचा थेंब नाही. अशा स्थितीत शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाने हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीत भाजीपाला व इतर पिकांकडे वळावे लागणार आहे. एकंदरित यावर्षी उशिरा आलेल्या पावसानेही शेतकरी हवालदिल झाला आहे.