उमरखेड तालुक्यात पेरण्या आटोपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 09:40 PM2019-07-11T21:40:00+5:302019-07-11T21:40:50+5:30
तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहे. त्यांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामाची भिस्त असलेले दोन नक्षत्र कोरडे गेल्याने आधीच शेतकरी दुष्काळाच्या सावटात आहे. तब्बल महिनाभर पेरण्या खोळंबल्या होत्या. यावर्षी पेरणी लांबली. मात्र आर्द्रा नक्षत्राने दिलासा दिल्याने किमान पेरणी पूर्णत्वास गेली आहे.
आर्द्रा नक्षत्रात शेवटच्या चरणात तालुकयात तुरळक पाऊस झाला. त्याच्याच भरवशावर शेतकºयांनी पेरणी आटोपली. आता मात्र केवळ ढगाळी वातावरण दिसत आहे. पावसाचा पत्ता नाही. आलाच तर एखादी सर कोसळते. मात्र दमदार पाऊस अद्याप झाला नाही. परिणामी जमितीन अद्याप खोलवर ओलावा पोहोचला नाही. जमिनीत ओलावा नसल्याने अंकुरलेल्या बियाण्याची वाड खुंटण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच शेतकरी बांधव दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
नदी, नाले अद्याप कोरडेच
दरवर्षी जुलै महिन्यात तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहतात. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अद्याप तालुक्यातील ओढे, नाले, नदी कोरडे आहेत. विहिरींमध्येही ठणठणाट आहे. जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. जुलै अखेरपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास पिकांवर परिणाम होऊन उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीची भिती जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे.