हजारो हेक्टरवरील पेरणी सापडली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:00 AM2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:25+5:30

मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊसच झाला नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाणांचे अंकुर करपण्याच्या मार्गावर आहे.

Sowing on thousands of hectares found in danger | हजारो हेक्टरवरील पेरणी सापडली धोक्यात

हजारो हेक्टरवरील पेरणी सापडली धोक्यात

Next
ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकरी झाले चिंतातुर; पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पावसाने डोळे वटारल्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊसच झाला नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाणांचे अंकुर करपण्याच्या मार्गावर आहे. मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती. मृग नक्षत्राच्या पूर्वार्धात ही पेरणी करण्यात आली. महागडे कपाशीचे बियाणे टोबण्यात आले होते. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती, त्यांनी स्प्रिंक्लरद्वारा ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या विद्युत पुरवठ्याच्या खोळंब्यामुळे अनेकांना ओलितही करता आले नाही. महागडे बियाणे जमिनीत पेरूनही पावसाअभावी बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. वरुणराजा प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे काही गावातील पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु तालुक्याच्या काही भागात अनेक दिवसांपासून पाऊसच झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास शेतातील पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक कपाशीचे पीक घेतले जाते. ५२ हजार ८७३ हेक्टर जमिनीपैकी ७० टक्के जमिनीत यावर्षी कपाशीचा पेरा आहे. त्याखालोखाल सोयाबीन, तुरी, ज्वारी, उडीद, मूग ही पिकेही घेतली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मशागत करून, कर्ज काढून बी-बियाणे व खताची खरेदी केली. परंतु पावसाअभावी आता ही पेरणीच धोक्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर पेरलेले बियाणे वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी सावकारांच्या दारात 
- आधीच नापिकीने व कर्जबाजारीपणामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. दुबार पेरणी करावी तरी कशी, या समस्येने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच अनेक खासगी सावकारांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.

 

Web Title: Sowing on thousands of hectares found in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.