दोन लाख हेक्टरवर पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:22 PM2018-06-15T22:22:52+5:302018-06-15T22:22:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मानसूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तब्बल दोन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हवामान खात्याने २२ जूनपर्यंत उघडीप राहणार असल्याचा अंदाज वर्तविला. या काळात शेतकऱ्यांनी सिंचनाची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. यामधील एक लाख ३० हजार ९९४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. २० हजार २६८ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. १६ हजार ६१५ हेक्टरवर तूर, १२५० हेक्टरवर मूग, १०५० हेक्टरवर उडीद, ६६ हेक्टरवर ज्वारी आणि २४३० हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली.
१२ ते २२ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार आहे. या काळात पिकांना ताण पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना घाई करू नये आणि सिंचनाची व्यवस्था असेल तरच पेरणीचा पुढाकार घ्यावा अन्यथा पेरणीसाठी प्रतीक्षा करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
एकीकडे पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप बियाणे खरेदीची तजवीज करता आलेली नाही. अद्याप पीककर्ज कधी मिळेल याच प्रतीक्षेत अनेकजण ताटकळत आहे. पाऊस पुरेसा बरसल्यावरही या शेतकऱ्यांची पेरणी पैशाविना खोळंबण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कापसाच्या विक्रमी पेऱ्याचे संकेत
यावर्षी खुल्या बाजारात कापसाचे दर तेज राहतील. असा प्राथमिक अहवाल जागतिक बाजारातून पुढे आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल अचानक कापसाच्या लागवडीकडे वळला आहे. यातून कृषी विभागाचा अंदाजही मागे पडला आहे. पहिल्या टप्प्याच्या पेरणीत एक लाख ४० हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. आठ दिवसाच्या या अहवालाने जिल्ह्यातील कपाशी लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याचे पुढे आले आहे. ८० टक्के क्षेत्रातल्या पेरण्या बाकी आहे. कृषी केंद्रातून मोठ्या प्रमाणात कपाशीची विक्री होत आहे. यामुळे गतवर्षीपेक्षाही जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे.