दहा लाखांवरील पेरण्या अडचणीत; विदर्भासह मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट

By रूपेश उत्तरवार | Published: July 4, 2023 10:55 AM2023-07-04T10:55:24+5:302023-07-04T10:56:54+5:30

पावसाची २० ते ६० टक्के तूट : हवामानाचे अंदाज खोटे ठरले

Sows over ten lakhs in trouble; Crisis of double sowing in Marathwada including Vidarbha | दहा लाखांवरील पेरण्या अडचणीत; विदर्भासह मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट

दहा लाखांवरील पेरण्या अडचणीत; विदर्भासह मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट

googlenewsNext

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी २० ते ६० टक्के पावसाची तूट आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर आणि डाळवर्गीय पीके आणि सुमारे दहा लाख हेक्टरवरील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. गत चार दिवसांपासून पाऊसच नसल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह खान्देशातील २० जिल्ह्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे.

संपूर्ण राज्यात एक कोटी ४२ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होते. यापैकी १८ लाख हेक्टरवरच्या पेरण्या आटोपल्या आहेत. यातील दहा लाख हेक्टर क्षेत्राची अवस्था बिकट आहे. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह खान्देशातील २० जिल्ह्यांचा यात समावेश आहे. कापसाचा लागवड कालावधी मिळविण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे. या ठिकाणी कापसाचे सर्वाधिक क्षेत्र धोक्यात आले आहे. गत पाच दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे कापसाचे पीक आता माना टाकत आहे. सोयाबीन अंकुरण्यासाठी त्याला पूर्ण ताकद मिळणेही अवघड झाले आहे.

कालावधी संपल्याने मूग आणि उडदाच्या पेरण्या विदर्भात झाल्या नाहीत. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातून हे क्षेत्र नगण्य झाले आहे. डाळवर्गीय पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह खान्देशातील २० जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूरमध्ये ७० टक्के तूट आहे. नागपूरमध्ये ५० टक्के, गोंदिया, अकोला, भंडारा, बुलढाणा आणि गडचिरोलीमध्ये ८० टक्क्यांपर्यंत तूट नोंदविण्यात आली आहे.

हवामानाचे अंदाज फेल ठरले

हवामान विभागासह पंजाब डख आणि इतर यंत्रणेकडून वर्तविण्यात आलेले पावसाचे अंदाज जून महिन्यात खोटे ठरले. यातून शेतकरी सर्वाधिक संकटात सापडले आहेत. यलो अलर्टनंतरही अनेक ठिकाणी पाऊस बरसला नाही. यामुळे पेरणी केलेले शेतकरी चांगलेच अडचणीत आहेत. आता काही ठिकाणी पीक अंकुरले आहे, तर अनेक ठिकाणी अंकुरण्याच्या अवस्थेत आहे. यात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

Web Title: Sows over ten lakhs in trouble; Crisis of double sowing in Marathwada including Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.