बोरगाव आरोग्य अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सोयाबीनचा साठा
By admin | Published: April 26, 2017 12:06 AM2017-04-26T00:06:27+5:302017-04-26T00:06:27+5:30
नेर तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रूग्णांना सेवा न देता चक्क सोयाबीनचा धंदा करतात,
गोदामाचे स्वरूप : नेरच्या सभापतींकडून भंडाफोड, चौकशीचे आदेश
यवतमाळ : नेर तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रूग्णांना सेवा न देता चक्क सोयाबीनचा धंदा करतात, असा आरोप नेरच्या सभापती मनीषा गोळे यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. यानंतर लगेच त्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
नेर तालुक्यातील बोरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी कधीच कर्तव्यावर उपस्थित नसतात, असा आरोप सभापती मनीषा गोळे यांनी केला. काही दिवसांपूर्वी या केंद्राला अकस्मात भेट दिली असता, ते गैरहजर आढळले. त्यांच्या सुटीचा अर्जही नव्हता. एवढेच नव्हे तर ते चक्क सोयाबीनचा धंदा करतात, असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या शासकीय क्वॉर्टरमध्ये आजही चक्क सोयाबीन भरून असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून सभागृहात एकच खळबळ उडाली.
अध्यक्ष माधुरी आडे, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मान्य केले. तसेच लगेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. चौकशीअंती त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देशही सिंगला यांनी दिले. आरोग्य विभागावरील चर्चेत स्वाती येंडे यांनी लोणबेहळ येथील आरोग्य केंद्रात पाणी टंचाई असल्याने रूग्णांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे सांगितले. लाख रायाजी येथील पाईप लाईन फुटल्याने दूषित पाणी नळाव्दारे घरोघरी पोहोचून अनेक ग्रामस्थांना डायरियाची लागण झाल्याचे तेथील महिला सदस्याने सांगितले. काही ठिकाणी चक्क सफाई कर्मचारीच डॉक्टरची भूमिका बजावत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. जिल्ह्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची १६ पदे असून त्यापैकी सहा पदे रिक्त असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी के. झेड. राठोड यांनी सभेत सांगितले. (शहर प्रतिनिधी)
‘सीईओ’ समस्या हसण्यावरी नेतात
शिवसेनेचे सदस्य श्रीधर मोहोड यांनी चर्चेदरम्यान, सदस्यांचे अनेक प्रश्न, समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी हसण्यावरी नेत असल्याचा आरोप केला. अनेक सदस्य नवखे असल्याने त्यांना व्यवस्थित समस्या मांडता येत नसतील, मात्र त्यांची तळमळ महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे प्रशासनाने जनतेच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.