सोयाबीन वितरकांना ‘गोल्ड’ची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:31+5:30

शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करतो आहे. आजही जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असल्याने पीक कर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. अशाही स्थितीत कुणी घरच्या लक्ष्मीचा दागिना मोडून तर कुणी उसनवारी करून, सावकारांकडून दीडीने पैसे घेऊन पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची तजवीज केली.

Soybean distributors are attracted to 'Gold' | सोयाबीन वितरकांना ‘गोल्ड’ची भुरळ

सोयाबीन वितरकांना ‘गोल्ड’ची भुरळ

Next
ठळक मुद्देमध्यप्रदेशातील कंपनी : बियाणे न उगवल्याने शेतकरी संतप्त, दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात पेरणी केलेल्या ३० टक्के शेतकऱ्यांचे बियाणेच उगवले नाही. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. बियाणे न उगवण्यामागे ‘सदोष बियाणे’ हेच प्रमुख कारण सांगितले जाते. मध्यप्रदेशातील एका विशिष्ट कंपनीनेच बहुतांश बियाणे विकले गेले असून ते उगवले नाही. या कंपनीच्या ‘गोल्ड’ ऑफरला अनेक वितरक बळी पडल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्या या लालसेने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करतो आहे. आजही जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असल्याने पीक कर्ज मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. अशाही स्थितीत कुणी घरच्या लक्ष्मीचा दागिना मोडून तर कुणी उसनवारी करून, सावकारांकडून दीडीने पैसे घेऊन पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची तजवीज केली. पाऊस पडताच पेरणीही उरकली. परंतु प्रत्यक्षात सोयाबीनचे हे बियाणे उगवलेच नाही. उमरखेडपासून वणीपर्यंत सर्वच तालुक्यातून शेतकºयांच्या या तक्रारी येत आहेत. बियाणे न उगवल्याने या शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणे खरेदीसाठी तजवीज करण्याची वेळ आली आहे. आधीचेच बियाणे कर्ज काढून घेतले, आता पुन्हा बियाण्यांसाठी पैसे आणावे कोठून याचा पेच शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
कृषी सूत्रानुसार, जिल्ह्यात मध्यप्रदेशातील एका विशिष्ट कंपनीनेच सर्वाधिक सोयाबीन बियाणे विकले गेले आहे. या कंपनीने प्रमुख वितरकांना १६ टनाच्या प्रत्येक वाहनावर दहा ग्रॅमचे गोल्ड क्वाईन (सोन्याचे नाणे) किंवा क्रेडीट नोट अशी ऑफर दिली होती. २२ ऑगस्ट २०२० ही त्यासाठी डेडलाईन आहे. बहुतांश वितरक गोल्ड क्वाईनच्या ऑफरला बळी पडले आणि त्यांनी याच कंपनीचे सोयाबीन बियाणे अधिक विकले. परंतु आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ३० टक्के बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी आहे. ९० टक्के शेतकºयांनी बियाण्यांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र काहींनी अद्याप पेरलेले नाही. उगवण क्षमता नसलेले हे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून काही वितरकांनी गोल्ड ऑफरच्या माध्यमातून ‘गरुडझेप’ घेतल्याचेही सांगितले जाते. सदर कंपनी हे बियाणे स्वत: बनवत नाही, बाहेरुन ते घेतले जाते व त्यावर स्व:चे ब्रॅन्डींग केले जाते, अशीही माहिती आहे.


घरचे बियाणे मात्र उगवले
यावर्षी अनेक वितरकांनी सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री केली होती. बियाण्याचे ८० ते ९० रुपये किलो दर पाहता अनेक शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे पेरण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला असून त्यांचे घरचे हे बियाणे उगवल्याचे सांगितले जाते.


वितरकांच्या उलट्या बोंबा
‘गोल्ड’वर नजर ठेऊन विशिष्ट कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या काही वितरकांनी आता शेतकऱ्यांच्याच नावे बोंबा ठोकणे सुरू केले आहे. हवामानाच्या व पावसाच्या संभाव्य स्थितीबाबत आम्ही वारंवार शेतकऱ्यांना संदेश पाठवून सूचित केले, २१ जूननंतर चांगला पाऊस असल्याने तेव्हाच पेरणी करावी, असा सल्ला दिला. मात्र शेतकऱ्यांनी हा सल्ला धुडकावून ३ ते ५ मार्चपासूनच पेरणी सुरू केली. दरम्यान पावसाने दडी मारल्याने बियाणे उगवले नाही, असा बचाव काही वितरक घेत आहेत.

कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण मागितले
सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी संतप्त आहेत, कृषी केंद्रांमध्ये धडक देत आहेत, बियाणे बदलवून मागत आहेत, आक्रमक होत आहेत, त्यातूनच दुर्घटना होण्याची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता संघाने वर्तविली आहे. अशा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण दिले जावे, अशा मागणीचे निवेदन २० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. संरक्षण न मिळाल्यास कृषी साहित्य विक्री प्रतिष्ठाने बंद ठेवावी लागेल, असेही त्यात नमूद करण्यात आले.

Web Title: Soybean distributors are attracted to 'Gold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती