सोयाबीन खरेदीचे तार पुसदमध्ये
By admin | Published: June 13, 2014 12:38 AM2014-06-13T00:38:43+5:302014-06-13T00:38:43+5:30
शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापाऱ्याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
पुुसद : शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापाऱ्याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. तो व्यापारी कोण, रक्कम कोणाच्या खात्यात जमा केली आणि बँकेच्या वेअर हाऊसमधून सोयाबीन पुसदला आले कसे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस तपास या सर्व बाबीवर केंद्रीत झाला असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
मानोरा तालुक्यातील व्यापारी अशोक मंत्री याने ४७ शेतकऱ्यांकडून आठ हजार ४०० पोते सोयाबीन खरेदी केले होते. त्याची रक्कम एक कोटी चार लाख रुपये आहे. हा माल बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमध्ये ठेवून तारण कर्ज एक कोटी २६ लाख रुपये घेऊन व्यापारी अशोक मंत्री पसार झाला होता. विशेष म्हणजे अशोक मंत्री याचा भाऊ सुरेशने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार मानोरा पोलीस ठाण्यात दिली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.
आपल्या मालाचे पैसे मिळतील की नाही, या विवंचणेत शेतकरी असताना काही जण त्यांना कोरडे आश्वासन देत होते. मात्र कोंडूली येथील शेतकरी विजय नानासाहेब देशमुख यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर मानोरा पोलिसांनी व्यापारी अशोक मंत्रीविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली. सध्या मंत्री हा न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणातील त्याचे तीन साथीदार मात्र फरार असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे.
या बहुचर्चित प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक करून हजारो क्विंटल सोयाबीन बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमधून पुुसद येथे आणून विकण्यात आला. या मालाची रक्कम पुसदच्या त्या व्यापाऱ्याने बँकेत जमा केली. ही रक्कम कोणाच्या बँक खात्यात जमा केली, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. मंगरुळपीर येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमध्ये ठेवलेले सोयाबीन पुसदला आले कसे, या कामी कोणी मदत केली, यात बँकेचा अधिकारी तर गुंतला नाही ना, पुसदला हा माल कोणी विकला, हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी करणारा पुसदचा तो व्यापारी कोण, असे अनेक प्रश्न आता पुढे आले आहे. विशेष म्हणजे वेअर हाऊसमधले सोयाबीन विकण्यामध्ये अनेक जण सहभागी असल्याची शक्यता असून यामध्ये अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)