जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा
By admin | Published: July 21, 2014 12:24 AM2014-07-21T00:24:26+5:302014-07-21T00:24:26+5:30
सोयाबीन बियाण्याचा तुटवडा आधीच होता. त्यात यंदा पावसाळा लांबल्याने पेरण्या उलटल्या. यातून सोयाबीन बियाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नामांकित बियाणे
यवतमाळ : सोयाबीन बियाण्याचा तुटवडा आधीच होता. त्यात यंदा पावसाळा लांबल्याने पेरण्या उलटल्या. यातून सोयाबीन बियाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नामांकित बियाणे बाजारात मिळणे अवघड झाले आहे. यावर मात करण्यासाठी शेतकरी पर्यायी पीक घेण्यासाठी धावाधाव करीत आहे. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी भरकटले आहेत.
जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. सहा लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. अनेकांना दुबार व तिबार पेरणीसुद्धा करावी लागली. त्यामध्ये ३ लाख ८२ हजार हेक्टरवर कापूस आहे. तर १ लाख ८० हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र निम्म्यावर आहे. असे असलेतरी यातील दोन लाख हेक्टरवर च्या पेरण्या निघाल्या नाही. त्या ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. पाऊस लांबल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला.
मात्र पाऊस येताच शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीचा कालावधी संपल्याने सोयाबीनकडे धाव घेतली. बाजारात एकच गर्दी वाढली. यातून बाजारातील सोयाबीनचे बियाणे संपले. आता नामांकीत कंपन्यांचे बियाणे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बियाणे मिळविण्यासाठी शेतकरी कृषी केंंद्र पिंजून काढत आहेत.
सोयाबीन बियाण्याला पर्यायी पीक म्हणून सूर्यफूल, बाजरीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र या पिकांना बाजारात योग्य दर नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी ते बाजारपेठ पिंजून काढत आहेत.
२० मिमी बरसला पाऊस
जिल्ह्यात १९ जुलैला सायंकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू होती. हा पाऊस जिल्हयात सर्वत्र बरसला. २० जुलैला सकाळी ८ पर्यंत २० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ४२ मिमी पाऊस यवतमाळ आणि नेर तालुक्यात बरसला. तर सर्वात कमी ४ मिमी पावसाची नोंद पुसदमध्ये करण्यात आली.
ज्वारीचा कालावधीही संपला
या स्थितीत ज्वारीसारख्या पीक घेण्याकडे शेतकऱ्यांनी सांगण्यात येत असले तरी ज्वारीच्या पेरणीचाही कालावधी संपला असल्याचे पुढे आले आहे. ज्वारीच्या पेरणीतून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तरी निकाली निघेल, असे वाटत असताना कालावधी संपल्यामुळे शेतकरी मात्र सैरभैर झाल्याचे चित्र दिसत आहे. (शहर वार्ताहर)