२५ हजार हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:26+5:30

पेरणीनंतर साधारणत: पाच दिवसात बियाणे अंकुरून कोंब फुटून ते जमिनीबाहेर यायला पाहिजे. परंतु अनेक शेतांमध्ये पेरणी होऊन आठवडा उलटला तरी कोंब फुटले नाही. या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जमिनीत असलेल्या ओलीच्या भरवशावर किमान कोंब जमिनीच्या बाहेर तरी यायला हवे होते. परंतु सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांनी जमीन उकरुन पाहिले असता काही दाणे सडले, काही मगरल्यासारखे दिसत आहे.

Soybeans have not grown in 25,000 hectares | २५ हजार हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही

२५ हजार हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही

Next
ठळक मुद्देदारव्हा तालुका : बियाणे बोगस, कृषी विभागाकडे तक्रारींचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यात आता सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचा प्रकार पुढे आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली. नुकसानग्रस्त शेतांचे तत्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. परिणामी कृषी अधिकारी थेट बांधावर धडकले आहे.
तालुक्यात खरीप हंगामासाठी ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी कापूस पिकानंतर सर्वाधिक म्हणजेच जवळपास २५ हजार ८०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. यावर्षी मशागतीची कामे उरकल्यावर १५ जूननंतर मोठ्या प्रमाणात सोयबीनची पेरणी करण्यात आली. मात्र अनेक गावात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहे. कापसाच्या तुलनेत कमी खर्च आणि बिगर कटकटीचे लवकर येणारे पीक म्हणून अलीकडे सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या विविध कंपनीचे बियाणे उपलब्ध आहे. या बियाण्याला मागणी वाढत असल्याने यावर्षी भावात मोठी वाढ झाली. त्यात ठरावीक कंपनीच्या बियाण्याला जादा मागणी होती. त्यामुळे मध्यंतरी तुटवडा पडल्यामुळे काहींनी जादा भावात बियाणे विकत घेतले. त्याच कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात आहे.
पेरणीनंतर साधारणत: पाच दिवसात बियाणे अंकुरून कोंब फुटून ते जमिनीबाहेर यायला पाहिजे. परंतु अनेक शेतांमध्ये पेरणी होऊन आठवडा उलटला तरी कोंब फुटले नाही. या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जमिनीत असलेल्या ओलीच्या भरवशावर किमान कोंब जमिनीच्या बाहेर तरी यायला हवे होते. परंतु सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांनी जमीन उकरुन पाहिले असता काही दाणे सडले, काही मगरल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमताच कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोयाबीन पेरणी करताना शेतीची मशागत व लागवडीला अंदाजे एकरी १० हजार रुपये खर्च येतो. जवळपास प्रत्येक शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात. परंतु सोयाबीन न उगवल्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. आता हंगाम वाया जाऊ नये म्हणून काही शेतकऱ्यांनी कुणाचीही वाट न बघता दुबार पेरणीसुद्धा सुरू केली आहे.
अनेक शेतकरी प्रशासनाकडून सर्वेक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. काहींनी कृषी विभागाकडे सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केली. मात्र काही तक्रार असेल तर सर्वांनी तसा लेखी अर्ज देणे आवश्यक आहे. तेव्हाच शेतीचा पंचनामा होऊन दखल घेतली जाऊ शकते, असे सांगितले जाते.

तक्रार निवारण समितीची स्थापना
बियाणे उगवण क्षमता, गुणवत्ता, या संदर्भात झालेल्या नुकसानासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती उपविभीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांचा समितीत समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समितीशी संपर्क साधून तक्रार करणे आवश्यक आहे.

अधिकारी पोहोचले बांधावर
सोयाबीन उगवले नसल्याची लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुधवारी तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामा करण्यात आला. याबाबत संयुक्त अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगितले जात आहे.

Web Title: Soybeans have not grown in 25,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती