सोयाबीन सात हजारांवर; विकू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 05:00 AM2022-02-28T05:00:00+5:302022-02-28T05:00:30+5:30
सोयाबीनचे दर गुरुवारी ७५०० रुपये क्विंटलवर होते. शुक्रवारी दर घसरले, ते ७१०० झाले. शनिवारी या दरामध्ये सुधारणा झाली यामुळे सोमवारी बाजार ७३०० वर जाण्याची शक्यता आहे. पुढे सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. युद्धामुळे सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज आहे. हे दर आठ हजारांपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता आहे.
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी सोयाबीनचे दर साडेसहा हजार रुपये क्विंटलवर थांबतील, असे भवितव्य वर्तविले जात होते. मात्र, युद्धाने सारे चित्रच बदलवून टाकले. सोयाबीनचे दर अचानक ७५०० वर पोहोचले. यानंतर दरामध्ये घसरण झाली, आता शनिवारी पुन्हा दर सुधारले आहे. यामुळे दरात पुढेही तेजी राहील, अशी शक्यता आहे.
गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ११ हजारांचा
- गतवर्षी मे, जून महिन्यात सोयाबीनला ११ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. असाच दर यावर्षी वाढेल अशी अपेक्षा होती. त्यामध्ये अनिश्चितता आहे.
उत्पादक म्हणतात....
शेतकरी गरजेनुसार सोयाबीन विकत आहे. यावर्षी ४० टक्के सोयाबीन शेतकऱ्यांकडे असण्याचा अंदाज आहे. युद्धामुळे दर खालीवर होत आहेत. मात्र, वाढतील, अशी प्रत्येकांनाच अपेक्षा आहे.
- पंडित हिंगासपुरे, शेतकरी
कापसाचे भाव १२ हजारांवर जातील आणि सोयाबीनचे दर दहा हजारांवर जाईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. यानंतरच शेतकरी शेतमाल विकायला काढतील.
- विनोद गुल्हाने, शेतकरी
आणखी भाव वाढणार
सोयाबीनचे दर गुरुवारी ७५०० रुपये क्विंटलवर होते. शुक्रवारी दर घसरले, ते ७१०० झाले. शनिवारी या दरामध्ये सुधारणा झाली यामुळे सोमवारी बाजार ७३०० वर जाण्याची शक्यता आहे. पुढे सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- गाैतम चोरडिया, व्यापारी
युद्धामुळे सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज आहे. हे दर आठ हजारांपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता आहे. मात्र, ते कधी पोहोचेल हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार आपल्या शेतमालाची विक्री करावी, सध्याचे दरही चांगले आहेत.
- राजू जैन, व्यापारी