‘एसपीं’नी उघडली हातभट्टीविरूद्ध मोहीम

By admin | Published: April 7, 2017 02:25 AM2017-04-07T02:25:31+5:302017-04-07T02:25:31+5:30

खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच आता अवैध धंद्यांवर पाश आवळणे सुरू केले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या

'SP' opened campaign against hatching | ‘एसपीं’नी उघडली हातभट्टीविरूद्ध मोहीम

‘एसपीं’नी उघडली हातभट्टीविरूद्ध मोहीम

Next

लाखोंची दारू पकडली : मुरझडीपाठोपाठ दुसऱ्या दिवशी यावलीत धाड
यवतमाळ : खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच आता अवैध धंद्यांवर पाश आवळणे सुरू केले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुरझडी शिवारात सलग दोन दिवस जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: धाडी टाकल्या. बुधवारी मुरझडी तलावाच्या काठावर सुरू असलेल्या हातभट्टी दारू कारखान्यावर स्वत: धाड टाकून त्यांनी आपल्या अनोख्या कार्यशैलीचा परिचय दिला. तसेच गुरुवारी यावली रोडलगत सुरू असलेल्या अवैध दारू गाळपावर धाड टाकली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
मुरझडी शिवारात तलावाच्या काठावर अनेक दिवसांपासून अवैध दारू गाळण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना मिळाली. त्यावरुन अत्यंत गोपनियता राखत बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी धाड मारली. घटनास्थळी मिळालेला एक लाख पाच हजार रुपयांचा मोहामाच व सडवा नष्ट करण्यात आला. यामध्ये कारखाना चालविणारे उत्तम तडमे व दिगांबर बन्सोड रा. दोघेही मुरझरी यांच्यावर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवून गुरुवारी यावली रोडलगत सुरू असलेल्या अवैध दारू गाळपावर धाड टाकली. या ठिकाणी चार दारू भट्टया आढळून आल्या. घटनास्थळी साठ प्लास्टिकचे ड्रम ज्यामध्ये २१०० लिटर मोहामाच व सडवा आढळून आला. टिनाच्या ९० पिंपात नऊशे लिटर दारू तसेच जंगलातून विनापरवाना आणलेले लाकूड असा एकूण एक लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी उत्तम तडसे रा. मुरझरी, संजय जिवने रा. भोसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, एलसीबीचे पोलीस निरिक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पतंगे, टोळी विरोधी पथकाचे एपीआय प्रशांत गीते, पीएसआय संतोष मनवर, भीमराव सिरसाठ, साहेबराव राठोड आदींसह जमादार शिवहर जवने, गजानन डोंगरे, विशाल भगत, सचिन हुमने, प्रशांत हेडाऊ व ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, गणेश देवतळे, साहेबराव राठोड व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

‘एसपीं’च्या कारवाईने धाबे दणाणले
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद झाली. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा आता हातभट्टीच्या दारूकडे वळविला आहे. त्यामुळे गावागावात दारूच्या भट्ट्या पेटायला लागल्या आहेत. याविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मोहीम उघडली आहे. खुद्द ‘एसपी’च प्रत्यक्ष दारूभट्टीच्या ठिकाणी धाड मारत आहेत. त्याठिकाणी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करीत आहेत. पोलीस अधीक्षक आपल्या शासकीय वाहनाऐवजी दुचाकीने धाडी घालत असल्याने कुणालाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. पोलीस अधीक्षकांच्या या अनोख्या मोहिमेमुळे दारू गाळणाऱ्यांचे तर धाबे दणाणले आहे, सोबतच त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांचीही पाचावर धारण बसली.

Web Title: 'SP' opened campaign against hatching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.