केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघाडणी
By admin | Published: January 1, 2016 03:49 AM2016-01-01T03:49:25+5:302016-01-01T03:49:25+5:30
जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत इंदिरा गांधी विकलांग योजनेची माहिती समितीचे अध्यक्ष केंद्रीय
यवतमाळ : जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत इंदिरा गांधी विकलांग योजनेची माहिती समितीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना विचारली. या अधिकाऱ्यांनी अशी योजना माहिती नसल्याचे उत्तर दिले. यावरून ना. अहीर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सभेत ग्रामीण पाणीपुरवठा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, रोजगार हमी योजना, कृषी विभागाच्या योजना यांचा सखोल आढावा घेण्यात आला.
दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत विषयानुरुप आढावा घेतला जात असताना अधिकाऱ्यांकडून चक्क खोटी माहिती दिली जात होती. भाजपा आमदारांकडून या अधिकाऱ्यांची पोलखोल करण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार मदन येरावार उपस्थित होते.
इंदिरा गांधी विकलांग योजना काय आहे, याची विचारणा ना.अहीर यांनी समाज कल्याण अधिकाऱ्याकडे केली. त्यांनी अशी कोणतीच योजना माहीत नसल्याचे सांगितले. जिल्ह्यात या योजनेतून केवळ २५७ अपंग, मतिमंद यांना लाभ दिला जातो. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अपंग व मतिमंदाचा आकडा फार मोठा आहे. तसेच या योजनेतून सिकलसेल ग्रस्तांनाही लाभ देण्याची सोय आहे. असे असतानाही त्याचा लाभ दिला जात नाही. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील ४० टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांची यादी तहसीलदारांकडे सादर करावी, सिकलसेल रुग्णांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने द्यावी, असे निर्देश दिले. या याद्या मिळताच इंदिरा गांधी विकलांग योजनेचा किती जणांना लाभ देता येतो त्यासाठी तहसीलदारांनी प्रयत्न करावे, असे सांगण्यात आले. अधिकारी वर्ग अपंग व मतिमंदांच्या योजना राबविण्यातही कुचराई करीत असल्याचे या बैठकीत उघड झाले. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या निधीअभावी रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील आमदारांनी निधी देण्याची तयारी दर्शविली. तशा योजनांची यादीच आमदारांकडे सादर करण्याचे निर्देश जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आर्णी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामात कंत्राटदाराने तक्रार केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती देण्यात आली. याबाबत आमदार राजू तोडसाम यांनी विचारणा केली. यावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सदर प्रकरणात कंत्राटदाराने मंत्र्याकडे तक्रार केली. मंत्र्यांनी केलेल्या सूचनेवरून काम थांबविण्यात आल्याचे सांगितले. या आक्षेपावर अहवाल तयार करून मंत्र्यांकडे त्वरित पाठवावा, असे निर्देश देण्यात आले. सिकलसेल रुग्णांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
रंगरंगोटी व टाईल्ससाठी नळयोजना बंद
४महागाव येथील नळ योजनेचे काम पूर्ण झाले असून ती का बंद आहे, अशी विचारणा आमदार राजेंद्र नजरधने यांनी केली. यावर जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याने अतिशय चिड आणणारे उत्तर दिले. रंगरंगोटी व टाईल्स बसविण्याचे काम थांबल्यामुळे योजना वर्षभरापासून बंद असल्याचे सांगितले. सुरुवातीला ही योजना सुरू असल्याचे उत्तर देत अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार नजरधने यांनी तुम्ही येथे भेट दिली काय असे विचारताच त्यांनी नुकताच प्रभार आल्याचे ठेवणीतील उत्तर समितीपुढे दिले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला सर्वांनीच धारेवर धरले.