बसस्थानक विकासासाठी विशेष निधी
By admin | Published: January 18, 2015 10:50 PM2015-01-18T22:50:05+5:302015-01-18T22:50:05+5:30
यवतमाळ बसस्थानकावरून दरदिवशी हजारो नागरीक ये-जा करीत असतात. परंतु त्या तुलनेत पाहिजे त्या सुविधा तेथे उपलब्ध नाही. बसस्थानकाबाबत वारंवार तक्रारीही होत असून त्
यवतमाळ : यवतमाळ बसस्थानकावरून दरदिवशी हजारो नागरीक ये-जा करीत असतात. परंतु त्या तुलनेत पाहिजे त्या सुविधा तेथे उपलब्ध नाही. बसस्थानकाबाबत वारंवार तक्रारीही होत असून त्यानुषंगाने बसस्थानक विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यासोबतच यवतमाळ हे जिल्ह्यातील एक आदर्श बसस्थानक बनविणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालकमंत्री राठोड यांनी अगदी सकाळी यवतमाळ बसस्थनकाला भेट देऊन पाहणी केली तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत अडीअडचणींसदर्भात चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मदन येरावार, परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पठारे, विभाग नियंत्रक लोखंडे, आगार प्रमुख दीपक इंगळे, विभागीय अभियंता के.आर. बिजवे यांच्यासह सामाजिक संस्थेचे अजय मुंधडा, उद्योजक राजेश्वर निवल, मनोज औदार्य आदी उपस्थित होते.
यवतमाळ बसस्थानकाचा परिसर अस्वच्छ राहत असल्याच्या तक्रारी आहे. यापुढे अस्वच्छता दिसता कामा नये. संबंधित कंत्राटदार सफाईचे काम व्यवस्थित करीत नसेल तर त्यास समज देऊन दिलेली रक्कम दंडासह वसूल करा. परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्याभरात कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
बसस्थानकावर खड्डे मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वच्छतेचे काम नीट होत नाही त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच यवतमाळ बसस्थानक एक आदर्श बसस्थानक म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठीही प्रस्ताव त्वरित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
बसस्थानक भर वस्तीत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी तात्पुरता पर्याय म्हणून एसटी बस आत जाणारे गेट पांढरकवडा रोड कडील बाजूस हलविणार असल्याचे सांगून त्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सुचविले. यामुळे बसस्थानक चौकातील गर्दी कमी होणार आहे.
पुढे सदर बसस्थानक आर्णी रोडवरील कार्यशाळेच्या जागेवर व कार्यशाळा एमआयडीसीत हलविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)