प्रत्येक गावात विशेष महिला ग्रामसभा
By admin | Published: March 8, 2015 02:04 AM2015-03-08T02:04:49+5:302015-03-08T02:04:49+5:30
जिल्ह्यातील नऊशे ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीमध्ये महिलांच्या मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील नऊशे ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीमध्ये महिलांच्या मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी प्रत्येक गावात महिलांची ग्रामसभा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
गावाच्या विकासात घरच्या कारभारणीने पुढाकार घ्यावा यासाठी जनजागृती केली जात आहे. याची सुरूवात महिला दिनापासून केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात विशेष महिला ग्रामसभा बोलविण्यात आली आहे. आजही ग्रामीण भागात महिलांच्या मतदानाची टक्केवारी प्रचंड कमी आहे. महिलांनी उत्स्फुर्तपणे आपला अधिकार वापरावा यावर भर दिला जात आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, त्यांच्या मतदानाने गावाचा विकास कसा साधता येईल यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या विशेष ग्रामसभेत महिला सक्षमीकरण, पाणी गुणवत्ता शौचालय बांधकाम, महिलांचे आरोग्य, मतदार नोंदणीत महिलांची संख्या वाढविणे, महिलांचा मतदानाचा हक्क या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)