जिल्हा परिषदेत सत्तेचा तमाशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:16 PM2019-05-08T22:16:39+5:302019-05-08T22:17:15+5:30
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी तमाशा सुरू झाला. नुकतेच दोन सभापतींना पायउतार करण्यात आले. यातून युती आणि आघाडीतील सदस्यांची सत्तेची हाव दिसून आली. पद मिळविण्यासाठी युती आणि आघाडीतील सदस्यांनी नितीमत्ता खुंटीला टांगल्याचेही यावरून दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेत सत्तेसाठी तमाशा सुरू झाला. नुकतेच दोन सभापतींना पायउतार करण्यात आले. यातून युती आणि आघाडीतील सदस्यांची सत्तेची हाव दिसून आली. पद मिळविण्यासाठी युती आणि आघाडीतील सदस्यांनी नितीमत्ता खुंटीला टांगल्याचेही यावरून दिसून आले.
जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने विचित्र युती करून सत्ता बळकावली. यात केवळ ११ सदस्य असलेल्या काँग्रेसला अध्यक्षपदासह एका सभापती पदाची लॉटरी लागली. भाजपला दुसऱ्या क्रमांकाच्या पदासह सभापती पद मिळाले. राष्ट्रवादी आणि अपक्षालाही एक सभापतीपद मिळाले. सर्व सुरळीत सुरू असताना आता राष्ट्रवादी व अपक्ष सभापतींना पायउतार करण्यात आले. अर्थात सदस्यांचा तो हक्क आहे. मात्र या सभापतींना पायउतार करताना सर्वांनीच नितीमत्ता गुंडाळून ठेवल्याचा प्रत्यय जिल्ह्यातील जनतेला आला.
राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने त्यांच्या ३८ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. इथपर्यंत कुणाची हरकत नव्हती. मात्र प्रत्यक्षात ठरावावरील मतदानात सर्वच पक्षांचे नेते आणि जिल्हा परिषदेतील त्यांच्या सदस्यांची नितीभ्रष्टता अधोरेखीत झाली. युती व आघाडीचे तुणतुणे वाजविताना त्यांच्यातील सत्तेचा खेळ समोर आला.
एका सभापतीच्या विरोधात युती अन् आघाडीचे सर्वच सदस्य एकवटले, तर दुसºया सभापतीविरूद्ध भाजप, शिवसेना युतीला राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी सहकार्य केले. काँग्रेसने तीन सभापतींच्या अविश्वासावर वेगवेगळी भूमिका घेऊन आपल्या सभापतीला मात्र वाचविले. ‘त्या’ सभापतीला पायउतार करण्यासाठी युतीला सहकार्य केले. यातून केवळ सत्तेसाठी तमाशा सुरू असल्याचे उघड झाले. आता नवीन सभापती निवडीत ही बाब पुन्हा प्रकर्षाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पायउतार झालेले दोन्ही सभापती उच्च न्यायालयात गेले आहे. त्यामुळे यात रंगत वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला संधी
तीनपैकी दोन सभापतींवर अविश्वास पारित झाला. आता या दोन पदांवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सदस्य विराजमान होणार असल्याचे सांगितले जाते. ही निवड बहुमताने होईल. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे महत्त्व आपोआप वाढणार आहे. त्यांचे ३८ सदस्य आहे. तथापि अविश्वासाच्या वेळी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सहकार्य केल्याने परतफेड म्हणून एक पद राष्ट्रवादीला दिले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा सत्तेसाठी सर्वांनीच नितीमत्ता गहाण ठेवल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, या सर्व प्रकारात त्या-त्या पक्षाचे वरिष्ठ नेतेही सहभागी असल्याची चर्चा आहे. नेत्यांनीच नितीमत्ता खुंटीला टांगल्याने जिल्हा परिषद सदस्य बेलगाम झाले आहे.